नागपूर – राज्य परिवहन महामंडळाकरिता नवीन बस घेण्यासाठी राज्य शासनाकडून अतिरिक्त 700 कोटी रुपये महामंडळाला देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे ग्रामीण तसेच शहरी भागात इलेक्ट्रिक बसेस घेण्यात येत असून यासाठी ग्रामीण भागात 170 ठिकाणी बस चार्जिग स्टेशन उभारण्याचे प्रस्तावित असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
सन 2016-17 पासून 2921-22 या कालावधीत एसटी महामंडळाने 3234 बसेस घेतल्या आहेत. यात 617 बसेस या भाडेतत्त्वावर ते 2617 बसेस या मालकी तत्वावर आहेत. राज्याकरिता मोठ्या प्रमाणावर बसेसची आवश्यकता असून नवीन 700 बसेस खरेदी अंतिम टप्प्यात असून नव्याने 2 हजार बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया प्रस्तावित आहे. 700 बसेसमध्ये 450 डिझेल बसेस, 50 इलेक्ट्रिक बसेस तर 200 निम-आरामदायी बसेसचा समावेश आहे.
या 700 बसेस पैकी 190 बस चेसिस ताब्यात मिळाले असून यावर बॉडी बिल्डिंगचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली. ग्रामीण भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शहरी भागातील शाळा, महाविद्यालयांत वेळेत जाण्यासाठी एसटीच्या वेळापत्रकात आवश्यक तो बदल केला जाईल. विद्यार्थी तसेच पालकांना बसेसच्या वेळेबाबत काही तक्रारी, सूचना असल्यास त्या डेपोमंडळामार्फत दूर केल्या जातील, असेही त्यांनी आपल्या उत्तरात सांगितले.