-हिमांशू
बिहार विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले आहेत आणि मध्य प्रदेशातील बहुचर्चित पोटनिवडणुकीचेही निकाल हाती आले आहेत. परंतु आपल्याकडे अनेकांना चढलेला अमेरिकेतल्या निवडणुकीचा ज्वर अजूनही उतरलेला नाही. हल्ली बरेच लोक अमेरिकेशी “थेट’ जोडलेले असतात. अगदी भारतापेक्षाही जास्त! त्यामुळे अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आणि ज्यो बायडेन यांच्यापैकी कोणता सद्गृहस्थ भारतासाठी अधिक चांगला ठरेल, याची फिकीर या मंडळींना अधिक आहे.
काहीजणांना तर वेगळीच फिकीर आहे. ती म्हणजे, जानेवारीत डोनाल्ड ट्रम्प व्हाइट हाउस सोडतील की “आम्ही नाही, ज्जा’ म्हणतील? आपल्याकडे सरकारी बंगले सोडताना अनेक माजी मंत्र्यांना मनस्ताप होतो. पाऊल उचलत नाही. अखेर काही जणांना प्रेमानं तर काही जणांना जरा कडक भाषेत “घर सोडा’ म्हणून सांगावं लागतं.
काय करणार! घरात जीव अडकलेला असतो संबंधितांचा! अहो, अनेकांना नवीन फ्लॅट घेतला तरी भाड्याचं घर सोडताना त्रास होतो; मग सरकारी घराची काय कथा! सत्ता गेल्याचं दुःख “जावे त्याच्या वंशा’ तेव्हाच कळतं. अमेरिकेची निवडणूक यावेळी अत्यंत चुरशीनं झाली. मतमोजणीत अखेरपर्यंत चढाओढ पाहायला मिळाली. डोनाल्ड ट्रम्प यांनी मतमोजणीवर अनेकदा आक्षेपसुद्धा घेतला. प्रकरण कोर्टात गेलं. अखेरीस डेमोक्रॅट बायडेन निवडून आल्याचं अधिकृतपणे जाहीर करण्यात आलं; पण ट्रम्पसाहेबांना हा निकाल पटलेला दिसत नाही.
बायडेन यांना जानेवारीत अध्यक्षपदाची सूत्रं हाती घ्यायची आहेत. माजी अध्यक्षांनी नूतन अध्यक्षांच्या हाती सूत्रं स्वाधीन करायची, असा तिथं रिवाज आहे. त्यावेळी ट्रम्पसाहेब नकार देतील आणि व्हाइट हाउस सोडायला नकार देतील, अशी शंका अनेकांना वाटतेय. कारण एक तर ट्रम्प यांनी आपला पराभव अजून स्वीकारलेला नाही. साहजिकच आहे. ही गोष्ट भल्याभल्यांना जमत नाही. आपल्याकडे ईव्हीएमचा विषय फक्त अशा वेळीच चर्चेत येतो.
दुसरी गोष्ट म्हणजे, ट्रम्प यांचा स्वभाव जग ओळखून आहे, म्हणूनच ही धास्ती अनेकांना वाटतेय. अमेरिकेच्या इतिहासात फार पूर्वी असं घडूनही गेलंय. तो किस्सा अत्यंत मनोरंजक आहे. जॉन ऍडम्स हे 1797 ते 1801 या काळात अमेरिकेचे अध्यक्ष होते. थॉमस जेफरसन यांनी त्यांना निवडणुकीत हरवलं, तरी ऍडम्स यांनी व्हाइट हाउस सोडायला नकार दिला.
सूत्रं प्रदान करण्याच्या कार्यक्रमाला म्हणजे जेफरसन यांच्या शपथविधीलाही ते हजर राहिले नाहीत. त्यामुळे अध्यक्षांच्या सेवेसाठी तैनात असलेले व्हाइट हाउसचे कर्मचारीसुद्धा (प्रेसिडेन्शियल स्टाफ) या समारंभाला जाऊ शकले नाहीत. आपण जेफरसन यांना कार्यभारही देणार नाही आणि व्हाइट हाउसही सोडणार नाही, हा हेका ऍडम्स यांनी कायम ठेवला.
जगाची आर्थिक महासत्ता मानल्या गेलेल्या अमेरिकेच्या माजी अध्यक्षाला व्हाइट हाउसमधून हाकलून कसं देणार? अखेर त्यासाठी एक मोठा प्लॅन तयार करावा लागला. प्रेसिडेन्शियल स्टाफने ऍडम्स यांचे आदेश ऐकणं बंद केलं. त्यांना दुर्लक्षित करायला सुरुवात केली. एवढंच नव्हे तर त्यांची सुरक्षाही काढून घेतली गेली. बरेच दिवस असा अपमान सहन केल्यानंतर ऍडम्स यांनी व्हाइट हाउस सोडलं. ट्रम्प यांच्या बाबतीत असं घडल्यास काय करायचं, याचं भारतात बसून काहीजणांना टेन्शन आलंय.