मॉस्को – किरगीझस्तानमध्ये स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर अशांतता निर्माण झाल्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाने गेल्या आठवड्यात झालेल्या निवडणुकांचे निकाल रद्द केले आहेत.
किरगीझस्तानची राजधानी बिश्केक आणि अन्य शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर सामाजिक अशांतता निर्माण झाली आहे. सरकार विरोधी या आंदोलनाला विरोधकांनी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा दिला असून काल रात्रीपासून सरकारी इमारतींचा ताबा घेतला गेला आहे. विरोधकांनी निवडणुकांच्या निकालांना रद्द करण्याची आणि देशात नव्याने निवडणुका घेण्याचीही मागणी केली आहे.
अंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारात शेकडो जण जखमी झाले आहेत आणि एकाचा मृत्यू झाला आहे. विरोधी पक्षांच्या सदस्यांनी अध्यक्षांना पदावरून हटवून नवीन सरकार स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे.
देशामध्ये निर्माण झालेले तणावाचे वातावरण अधिक वाढू नये, म्हणून निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचा निर्णय मुख्य निवडणूक आयुक्त नूरजहां शैलदाबेकोव्हा यांनी स्थानिक वृत्तसंस्थेला कळवला.
किरगीझस्तानमधील निवडणुकांचे प्राथमिक कल रविवारी रात्रीपासून जाहीर व्हायला सुरुवात झाल्यावर हिंसक आंदोलनांना सुरुवात झाली होती. सत्तारुढ पक्षाशी संबंधित दोन पक्षांनी मते विकत घेतली आणि निवडणुकांच्या नियमांचा भंग केला असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जाऊ लागल्यावर हे आंदोलन सुरू झाले.