कोल्हापूर आणि हातकणंगले मतदार संघांची मतमोजणी तयारी पूर्ण

 जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांनी घेतला आढावा

कोल्हापूर: देशात उद्या लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार आहे. कोल्हापुरात देखील दोन्ही मतदार संघातील मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे.कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी रमणमळा याठिकाणी तर हातकणंगले मतदार संघासाठी राजाराम तलाव याठिकाणी मत मोजणी होणार आहे.या दोन्ही ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एकूण 22 फेऱ्या मध्ये मतमोजणी होणार असून व्हीव्हीपॅटसह मतमोजणी संपायला रात्री 11 वाजण्याची शक्यता आहे.दरम्यान विजयी मिरवणुकीला बंदी घालण्यात आली असून 144 कलम अंतर्गत हद्दपरीच्या नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय धान्य गोदाम, रमणमळा परिसर, कसबा बावडा रोड, कोल्हापूर येथे तर हातकणंगले लोकसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय गोदाम, राजाराम तलावनजीक,सरनोबतवाडी कोल्हापूर येथे होणार आहे. कोल्हापूर लोकसभा मतदार संघासाठी एकूण 1160 तर हातकणगले लोकसभा मतदार संघासाठी 1044 अधिकारी व कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहे. मतमोजणी केंद्र आणि परिसरात पोलीस, राज्य राखीव पोलीस दल, केंद्रीय पोलीस दल यांच्यामार्फत कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आलेली आहे.  कोल्हापूर लोकसभा मतदार संघातील चंदगड, राधानगरी, कागल, कोल्हापूर दक्षिण, करवीर आणि कोल्हापूर उत्तर या सहा मतदार संघांतील मतमोजणी प्रत्येकी 20 टेबलावर होणार आहे. यामध्ये 272 राधानगरी विधानसभा मतदार संघातील मतमोजणीसाठी सर्वाधिक 22 फेऱ्या होणार आहेत तर हातकणंगले लोकसभा मतदार संघातील शाहुवाडी, हातकणंगले, इचलकरंजी, शिरोळ, इस्लामपूर आणि  शिराळा या सहा मतदार संघातील मतमोजणी प्रत्येकी 20 टेबलांवर होणार आहे.

जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मतमोजणी परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आल्याचे  सांगितले. तसेच दिनांक 22 मे रोजीच्या रात्रीपासूनच जिल्ह्यातील प्रवेशित मार्गावरही नाकाबंदी करण्यात येणार आहे. मतमोजणीसाठी पोलीस बंदोबस्त सुसज्ज असून जिल्ह्यात 2400 पोलीस कर्मचारी,150 पोलीस अधिकारी, 1500 होमगार्ड, 90 एसआरपी कर्मचारी बंदोबस्त पाहणार आहेत.

प्रत्येक विधानसभा मतदार संघातील सरमिसळ पध्दतीने (रॅन्डम) निवडलेल्या पाच मतदान केंद्रांवरील व्हीव्हीपॅट सिल्पची मोजणी त्या त्या विधानसभा मतदार संघांच्या मतमोजणी कक्षामध्ये सहायक निवडणूक अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.