“निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा, ते फार सरळमार्गी नेते आहेत”

संजय राऊत यांनी पंतप्रधानांचे कौतुक करत लगावला टोला

नवी दिल्ली: देशात करोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला आजपासून सुरुवात झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून याची सुरुवात झाली आहे. नरेंद्र मोदी यांनी सकाळी एम्स रुग्णालयात भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन लस घेतली. मोदींनी ट्विटरला फोटो शेअर करत पात्र असणाऱ्या नागरिकांना देशाला करोनामुक्त करण्याचे आवाहन केले. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी बोलताना लस घेतल्यावरुन कौतुक केले आहे.

“पंतप्रधानांनी करोना लस घेतली आहे. राष्ट्रपती घेतील, केंद्रीय मंत्रीदेखील घेतील. सर्व जनतेला लस मिळायला हवी. पंतप्रधानांनी लस घेतल्याने जनतेचादेखील आत्मविश्वास वाढेल. त्यामुळे मोदींनी सर्वासमोर येऊन लस घेत जो विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे स्वागत करतो. हे महत्वाचे आहे. अमेरिकेत बायडन यांनी लस घेतली तेव्हा तेथील जनतेलाही ही लस आपले रक्षण करेल असा विश्वास वाटला. आज आपल्या देशात पंतप्रधानांनी लस घेतली हे कौतुकास्पद आहे,” असे संजय राऊत म्हणाले.

मोदींनी लस घेतली असली तरी त्यामागील निवडणुकीच्या कनेक्शनची चर्चा रंगली आहे. मोदींनी गळ्यामध्ये आसामी लोकांची ओळख आणि प्रतिक मानला जाणारा गमछा घातला होता. हा गमछा त्यांना काही आसामी महिलांनी भेट दिला होता. मोदींसोबत फोटोमध्ये दिसणाऱ्या नर्सपैकी एकजण पुद्दुचेरीची तर दुसरी केरळची आहे. याबद्दल विचारण्यात आले असताना संजय राऊत यांनी म्हटले की, “राष्ट्रीय एकात्मता म्हणून पहा ना…हा फक्त काँग्रेसचाच मक्ता नाही ना असं म्हणेन मी. मोदी काँग्रेसच्या मार्गावर चालले आहेत. पूर्वी काँग्रेसचे नेतेही अशाच भूमिका घेत होते. सगळ्या देशातील राज्यातील नेते आपल्या अवतीभोवती असतील याची काळजी घेत. निवडणुका आहेत हा तुमच्या डोक्यातील किडा आहे. त्यांच्या डोक्यात कदाचित ते नसेलही. ते फार सळमार्गी नेते आहेत”.

“विरोधकांनी सरकारला घेरण्यापेक्षा अधिवेशनाच्या वेळेत काही चर्चा घडवल्या तर ते महाराष्ट्र आणि जनतेसाठी फायद्याचे ठरेल. भाजपामधील प्रमुख नेत्यांना चर्चेची फार आवड असते. त्यांना ही संधी असून चर्चा केली पाहिजे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, इतर नेते उत्तर देतील. त्यामुळे ही संधी ही त्यांनी वाया घालवू नये,” असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.