नवी दिल्ली -झारखंडमध्ये उद्या (बुधवार) विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यासाठी मतदार हक्क बजावणार आहेत. त्याशिवाय, १० राज्यांतील विधानसभांच्या ३१ जागांसाठी आणि लोकसभेच्या एका जागेसाठी (वायनाड-केरळ) पोटनिवडणुका होणार आहेत. त्यामुळे देशातील ११ राज्यांत विविध ठिकाणी मतदान होईल.
झारखंडमध्ये विधानसभेच्या एकूण ८१ जागा आहेत. त्यातील ४३ जागांसाठी पहिल्या टप्प्यात मतदान होईल. त्याशिवाय, राजस्थान, पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, कर्नाटक, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तिसगढ, केरळ आणि मेघालय या राज्यांत विधानसभा पोटनिवडणुकांसाठी मतदान होणार आहे. राजस्थानातील सर्वांधिक ७, तर त्याखालोखाल बंगालमधील ६ विधानसभा जागा पोटनिवडणुकांना सामोऱ्या जात आहेत.
आसाममधील ५, बिहारमधील ४ विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे. झारखंडमध्ये दुसऱ्या आणि अंतिम टप्प्यासाठी मतदार २० नोव्हेंबरला हक्क बजावतील. त्याच दिवशी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. लोकसभा निवडणुकीनंतर काही महिन्यांनी संबंधित निवडणुका आणि पोटनिवडणुका होत आहेत. त्यामुळे त्यांच्या निकालांकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. ते निकाल एकाच दिवशी २३ नोव्हेंबरला जाहीर होतील.