निवडणूक चिन्हांत स्टॅपलर, लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, फोन चार्जर

– राज्य निवडणूक आयोगाकडे 260 राजकीय पक्षांची नोंदणी
– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी 190 मुक्त चिन्हे

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 260 राजकीय पक्षांची नोंदणी झाली असून यापैकी 16 मान्यताप्राप्त राजकीय पक्ष असल्याने त्यांची निवडणूक चिन्हे आरक्षित आहेत. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष; तसेच अपक्ष उमेदवारांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आता 48 ऐवजी 190 मुक्त चिन्हे निश्‍चित केली आहेत. विशेष म्हणजे या निवडणूक चिन्हांत आता लॅपटॉपसह फोन चार्जर आणि पेन ड्राइव्हचाही समावेश करण्यात आला आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी आज येथे दिली.

राज्यातील ग्रामपंचायती वगळता अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जातात. त्यासाठी संबंधित राजकीय पक्षांना राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे बंधनकारक असते. भारत निवडणूक आयोगाकडून मान्यताप्राप्त पक्षाने राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी केल्यास संबंधित पक्षाचे निवडणूक चिन्ह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित केले जाते, असे मदान यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाकडे अशा एकूण 16 पक्षांनी नोंदणी केली आहे. त्यात सहा राष्ट्रीय, दोन महाराष्ट्रातील राज्यस्तरीय; तर आठ इतर राज्यातील राज्यस्तरीय राजकीय पक्षांचा समावेश आहे. उर्वरित 244 नोंदणीकृत राजकीय पक्ष आहेत. यांच्यासाठी कुठलेही निवडणूक चिन्ह आरक्षित नसते. हे सर्व मिळून आतापर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे एकूण 244 राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे, अशी माहिती मदान यांनी दिली.
राज्य निवडणूक आयोगाच्या 18 जानेवारी 2017 च्या अधिसूचनेनुसार 48 मुक्त चिन्हे निश्‍चित करण्यात आली

होती. त्यात आता 30 नोव्हेंबर 2019 रोजीच्या अधिसूचनेनुसार 142 नव्या चिन्हांची भर घालण्यात आली आहे. त्यामुळे ही संख्या आता 190 झाली आहे. भारतीय कम्युनिस्ट पक्ष (कणीस आणि विळा), भारतीय जनता पार्टी (कमळ), नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी (घड्याळ), भारताचा कम्युनिस्ट पक्ष माक्‍र्सवादी (हातोडा विळा व तारा), बहुजन समाज पक्ष (हत्ती), भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस (हात) या राष्ट्रीय पक्षांसाठी आणि शिवसेना (धनुष्यबाण) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना (रेल्वे इंजिन) या महाराष्ट्रातील राज्यस्तरीय पक्षांसाठी; तसेच जनता दल सेक्‍यूलर (डोक्‍यावर भारा घेतलेली स्त्री), समाजवादी पार्टी (सायकल), इंडियन युनियन मुस्लिम लीग (शिडी), लोक जनशक्ती पार्टी (बंगला), ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (दोन पाने), जनता दल युनायटेड (बाण), ऑल इंडिया मजलिस हत्तेहदूल मुस्लिमीन (पतंग) व आम आदमी पार्टी (झाडू) या इतर राज्यातील राज्यस्तरीय पक्षांसाठी संबंधित निवडणूक चिन्हे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठीदेखील आरक्षित आहेत, असेही मदान यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)