Election Result 2023 – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( narendra modi ) यांचा करीष्मा, देशासाठी भाजपाने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे नियोजन यामुळे भाजपाप्रणीत एनडीएला तीन राज्यांत घवघवीत यश मिळाले आहे. आतापर्यंत ‘घर घर मोदी’, असे म्हटले जात होते, पण यापुढे ‘मन मन मे मोदी’, अशी घोषणा द्यावी लागेल असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde ) यांनी व्यक्त केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे पुढे बोलताना म्हणाले की, तीन राज्यात बहुमताने एनडीएला विजय मिळाला आहे. इंडिया आघाडी द्वेष, मत्सराने भरलेली आहे. मोदींवर नको नको ते आरोप लावले तरी जनतेने मतपेटीतून इंडिया आघाडीला उत्तर दिले आहे. तर राहुल गांधी परदेशात जाऊन मोदींची बदनामी करत होते. हे लोकांना मान्य नव्हते.
राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले ते त्यांनी पाळले नव्हते. सत्ता आल्यावर योजना पूर्ण करायला पैसै नाहीत, असा खुलासा त्यांनी केला होता. मोदीजींच्या विचारांचा विजय आहे. येणाऱ्या निवडणुकीत ही जनता कॉंग्रेसला हद्दपार करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
हिच लोकसभेची अंतिम फेरी
हीच लोकसभेची अंतिम फेरी असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे लोकसभेचा निकाल अगदी स्पष्ट आहे. २०२४ ला इंडिया आघाडीचे पानीपत होईल आणि आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा सत्तेवर आरूढ होतील.
महाराष्ट्रातील इंडिया आघाडीत असलेले काही पक्षाचे नेते बेगानी शादी मे, अब्दुला दिवाना अशापद्धतीने वागत होते. या घरी बसलेल्या नेत्यांना जनता मतदानातून कायमची घरी बसवेल, अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.