प्रचाराच्या तोफा आज थंडावणार

विधानासभेसाठी सोमवारी मतदान : जिल्ह्यातून 246 उमेदवार रिंगणात

पुणे – विधानसभा निवडणुकीसाठी येत्या सोमवारी (दि.21) मतदान होणार असून प्रचाराची सांगता शनिवारी (दि.19) होणार आहे. त्यामुळे प्रचाराच्या मुलुखमैदानी तोफा शनिवारी थंडावणार आहे. मागील दोन आठवड्यांपासून मेळावे, प्रचारसभा, कोपरासभा, प्रत्यक्ष गाठीभेटी याद्वांरे निवडणुकीचे रण तापविणाऱ्या राजकीय पक्षांसाठी प्रचाराची मुदत शनिवारी सायंकाळी 5 वाजता संपत आहे. यानंतर पुढील काही तास डोळ्यात तेल घालून प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या गुप्त हालचाली टिपण्यावर कार्यकर्त्यांचे लक्ष राहणार आहे.

पुणे जिल्ह्यातील 21 विधानसभा मतदारसंघासाठी तब्बल 246 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाच समावेश होतो. दि.7 ऑक्‍टोबरला निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली. यंदाची विधानसभेची निवडणूक पक्षांतरामुळे गाजली. सकाळी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार तर संध्याकाळी भाजपमध्ये प्रवेश असो किंवा कॉंग्रेस- राष्ट्रवादीच्या काही पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये केलेला प्रवेश असो, यामुळे ही निवडणूक लक्षवेधी ठरली.

प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरात सभा घेतली. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनीदेखील सभा घेतली. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही सभा घेतली. त्याचबरोबर कॉंग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारसाठी राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, ज्योतीरादित्य सिंधिया यांच्या सभा होणार होत्या, पण त्या रद्द झाल्या. विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडून वातावरणात खऱ्या अर्थाने रंग भरला. यंदाच्या निवडणुकीमध्ये स्थानिक प्रश्‍नांवर समस्यांवर चर्चा झाली नाही. देशपातळीवरील प्रश्‍न, विकासाचे मुद्दे, सरकारचे विविध प्रश्‍नांकडे झालेले दुर्लक्ष यावरच प्रचाराचा भर राहिला. ग्रामीण भागातही राजकीय पक्षांच्या नेत्यांना पायाला भिंगरी लावून फिरावे लागले. तसेच कमी कालावधीत अनेक सभा घेण्यासाठी हेलिकॉप्टरच्या वापरदेखील मोठ्या प्रमाणावर झाला.

जागता पहारा
शनिवारी (दि.19) सायंकाळी अधिकृत प्रचार समाप्त होत असला तरी छुप्या पद्धतीने प्रचार सुरू राहणार आहे. मतदारांपर्यत व्होटर स्लीप पोहचल्या आहेत किंवा नाही. मतदानच्या पोलिंग एजंट नेमणे, बुथ उभारणे व याठिकाणी राबणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी चहा-पाण्याची व्यवस्था करणे. फोडाफोडीचे राजकारण, नाराजांचे मन वळविण्याचा प्रयत्न अणि याहून अगोदरच्या रात्री आपली हक्काची मते राखण्यासाठी कार्यकर्त्यांना जागता पहारा द्यावा लागणार आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)