इंदापूर तालुक्‍यात मतदान केंद्रे सज्ज

मतदान पेट्या, सर्व साधन सामग्री ज्या-त्या केंद्रांवर पोहोचवली

रेडा – इंदापूर विधानसभा मतदारसंघात निवडणूक प्रशासन मतदानासाठी सज्ज झाली आहे. इंदापूर तालुक्‍यातील एकूण 329 मतदान केंद्रावर निवडणूक प्रशासन पोलिसांच्या बंदोबस्तात सज्ज झाली आहेत. इंदापूर शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण साळुंखे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी सोनाली मेटकरी व महसूल प्रशासनातील अधिकारी यांनी तालुक्‍यातील सर्व मतदान केंद्रावरील अधिकाऱ्यांना रविवार (दि.20) मतदान पेट्या व सर्व साधन सामग्रीचे वाटप केले.

एसटी बसने सर्व साहित्य मतदान केंद्रावर पोहचते केले आहे. सोमवारी (दि.21) सकाळी 6 वाजता सर्व मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झालेली आहेत. सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघात 1 लाख 59 हजार 801 पुरुष मतदार, 1 लाख 45 हजार 777 महिला व इतर 1 असे एकूण 3 लाख 5 हजार 579 मतदार मतदान करणार आहेत. इंदापूर पोलीस ठाण्याने तालुक्‍यातील नागरिकांना भयमुक्‍त मतदान करता यावे, निवडणुकीत कोणतीही बाधा आणू नये, यासाठी पूर्वी अनेक गुन्हे दाखल असलेल्या एकूण 468 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली आहे. त्यातील एकूण 90 जणांवर तडीपारीची कारवाई केली आहे. त्या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

इंदापूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मधुकर पवार यांनी जनतेला आवाहन केले आहे की, आपला मतदानाचा अधिकार भयमुक्‍तपणे बजवावा, मतदानाचा हक्‍क बजावत असताना जर आपल्याला कोणी अडवणूक करीत असेल अथवा दमदाटी करत असेल तर आपण इंदापूर पोलीस ठाण्याशी तक्रार करू शकता.

दोन चेक पोस्ट
इंदापूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत इंदापूर तालुक्‍यातील सरडेवाडी टोल नाक्‍यावर व सराटी येथे दोन चेक पोस्ट नाके लावण्यात आली आहेत. त्यामध्ये 1 अधिकारी, 4 कर्मचारी, एक कॅमेरामन व एक महसूल अधिकारी वाहनांची कसून तपासणी करीत आहेत. बारा पोलीस अधिकारी, दीडशे होमगार्ड, शंभर पोलीस कर्मचारी असा तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.