पुणे – करोना रोधक लसीकरणासाठी शहरात निवडणूक प्रक्रिया पॅटर्न राबविण्यात येणार आहे. निवडणुकीत ज्या प्रमाणे मतदार यादी, बुथ, तसेच मतदानासाठी केंद्रावर गेल्यानंतर ओळखपत्र तपासणी करून मतदार निश्चित केला जातो. त्याचप्रमाणे लसीकरणासाठी शहरात 100 जणांची एका बॅच केली जाणार आहे. त्यासाठी बुथ असून केंद्र शासनाकडील नोंद तसेच त्यांना आधारकार्ड सक्तीचे असणार आहे.
भारतात लसीकरणासाठी तीन कंपन्यांनी तातडीची परवानगी मागितली आहे. तर, केंद्राकडूनही डिसेंबर अखेरपर्यंत देशाला लस मिळेल असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे केंद्राकडून लसीकरणाच्या शितसाखळ्या उभारण्यासाठी स्थानिक पातळीवर लसीकरण कशा पद्धतीने करावे त्याची रचना कशी असावी याबाबत निर्देश दिले. हे निर्देश केंद्राकडून प्राप्त झाल्यानंतर राज्य शासनाने ते महापालिकेस दिले असून ज्याप्रमाणे निवडणूक मतदान प्रक्रिया राबविली जाते. त्याच धर्तीवर शहरातही हे लसीकरण केले जाणार आहे. त्यासाठी पालिकेकडून 40 डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात आले असून हे डॉक्टर आता उर्वरीत कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार आहेत. दरम्यान, केंद्राकडून पहिल्या टप्प्यात शासकीय तसेच खासगी वैद्यकीय कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 48 हजार जणांची नोंदणी झाली आहे.
…अशी असेल लसीकरण प्रक्रिया
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, लसीकरणासाठी प्रत्येकी 100 जणांची बॅच असणार असून त्यांच्या लसीकरणासाठी बुथ असणार आहे. या बुथची माहिती केंद्राकडून आलेल्या यादीनुसार, संबंधितांना दिली जाणार असून त्यांनी त्या ठिकाणी जाऊनच लस घ्यायची आहे. केंद्रात गेल्यानंतर संबंधित व्यक्तीचे नाव ऑनलाइन स्वरुपात केंद्राच्या संगणक प्रणालीत तपासले जाईल. त्या यादीत नाव असेल तर संबंधित व्यक्तीस ओळखीचा पुरावा म्हणून आपले आधारकार्ड नंबर द्यावा लागेल. त्यानंतर संबंधित व्यक्तीस लस दिली जाईल. या केंद्रावर पाच जणांचे पथक असणार असून त्यात, लस देणारे डॉक्टर, संगणकावर यादी तपासणीस, ओळखपत्र तपासणीस आणि 2 मदतनीस असणार आहेत.
…असा असेल संभाव्य क्रम
- पहिला टप्प्पा : सर्व खासगी तसेच शासकीय वैद्यकीय कर्मचारी
- दुसरा टप्पा : फ्रंटलाईन कर्मचारी (पोलीस, स्वच्छता कर्मचारी, करोना नियंत्रणाचे काम करणारे प्रशासकीय अधिकारी)
- तिसरा टप्पा : 50 वर्षांवरील व्यक्ती (इतर गंभीर स्वरुपाचे आजार असलेल्या व्यक्तींना प्राधान्य
- चौथा टप्पा : 50 वर्षांच्या आतील व्यक्ती