वाघोली : पुणे महानगरपालिकेत वाघोलीचा समावेश झाल्यानंतर वाघोलीला उपनगराचा दर्जा मिळाला आहे. याच उपनगराचा शहराध्यक्ष पदाचा बहुमान भाजपचे विजय जाचक यांना मिळाला असून वाघोली शहराध्यक्षपदी त्यांना निवडीचे पत्र हवेली तालुका भाजपचे अध्यक्ष श्याम गावडे यांच्या हस्ते देण्यात आले.
हवेली तालुक्यात भाजपचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी भाजपचे जाचक यांनी संघटनात्मक जबाबदारी वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून प्रभावीपणे पूर्ण केली होती. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरावरून अभिनंदन होत आहे. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, क्रीडा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संदीप भोंडवे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती रवींद्र कंद, संजय कड, सुरेश जगताप, माजी सरपंच ओंकार कंद, आदी मान्यवर उपस्थित होते.
भाजप ॲक्शन मोडवर….
शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघावर भाजपने आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी मोठी धडपड सुरू केली आहे. याच काळात तत्कालीन वाघोली भाजप च्या शहराध्यक्षपदी असणारे केतन जाधव यांच्यावर पक्ष विरोधी काम केल्याचा ठपका ठेवत शिस्तभंग निलंबनाची कारवाई करून पाच वर्षासाठी भारतीय जनता पार्टी मधून निलंबित करण्यात आल्याचे पत्र तालुकाध्यक्ष श्याम गावडे यांनी काढले होते.
यानंतर भाजपचे किसान मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष दादासाहेब सातव यांच्यावर देखील शिस्तभंग निलंबन कारवाई व्हावी यासाठी भाजपच्या हवेली तालुक्यातील प्रमुख प्रदेश, जिल्हा व तालुका स्तरावरील जवळपास 30 पदाधिकाऱ्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे दादासाहेब सातव यांचेवर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे. विधानसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर पक्ष विरोधी काम करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर ॲक्शन मोडमध्ये आल्याचे दिसून येत आहे.