पुणेः विधानसभा निवडणुकीनंतर आता सर्वांनाच वेध लागलेले आहेत ते स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीच्या तयारीला अनेकजण लागले आहेत. येत्या काही महिन्यातच या निवडणुका लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आमदार शंकर जगताप यांनी मोठं विधान केलं आहे. महानगपालिकेच्या निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार असल्याचे ते म्हणाले आहेत. पिंपरी चिंचवड येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे विधान केलं आहे.
२०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीकडून सत्ता खेचून आणली होती. आगामी निवडणुकीत त्यापेक्षा अधिक नगरसेवक निवडून आणण्याचा प्रयत्न असल्याचे आमदार शंकर जगताप यांनी सांगितले. आगामी महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. २०१७ मध्ये दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार महेश लांडगे यांनी राष्ट्रवादीचा सुपडा साफ केला होता. त्याची पुनरावृत्ती करू, असा विश्वास आमदार शंकर जगताप यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
विविध योजना, उपक्रम भाजपच्या वतीने पिंपरी चिंचवडमध्ये राबविण्यात येत आहेत. प्रत्येकाच्या घराघरापर्यंत आम्ही पोहचत आहोत. महानगरपालिकेच्या निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही तयार आहोत. स्वबळावर की महायुतीमध्ये आगामी निवडणूक लढणार हे स्पष्ट नाही. वरिष्ठ जो निर्णय घेतील त्यावर पुढची रणनीती आखणार असल्याचे शंकर जगताप यांनी सांगितले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वबळाचे नारे?
येत्या काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर होणार आहेत. शिवसेना उबाठा पक्षाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. यामुळे आघाडीत बिघाडी झाली असल्याची चर्चा होताना दिसत आहे. यामुळे आगामी काळात या निवडणुकांसाठी स्वबळाचे नारे दिले तर आश्चर्य वाटायला नको.