देहूगाव, (वार्ताहर) – देहू नगरपंचायतीच्या रिक्त झालेल्या उपाध्यक्षपदी मयूर शिवशरण तर पाणीपुरवठा व जलनि:सारण समिती सभापतीपदी सुधीर काळोखे यांची पीठासीन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी संजय असवले यांनी बुधवारी (दि. १९) निवड जाहीर केली.
देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष सुधीर काळोखे यांनी राजीनामा दिल्याने अडीच वर्षांतील उपाध्यक्षपदासाठी चौथी निवडणूक प्रक्रिया नगरपंचायत सभागृहांमध्ये पार पडली. उपजिल्हाधिकारी संजय असवले हे निवडणूक प्रक्रियेचे अधिकारी होते.
निवडणूक प्रक्रियेला सकाळी १० वाजता सुरुवात झाली. नगरपंचायतीच्या उपाध्यक्ष पदासाठी मुख्याधिकारी यांच्याकडे नाम निर्देशन पत्र सादर करणे, पिठासीन अधिकारी यांनी नामनिर्देशन पत्राची छाननी करणे, नामनिर्देशन पत्र माघार घेणे, आवश्यकतेनुसार उपाध्यक्षपदाची निवडणूक घेण्याच्या प्रक्रीयेमध्ये मयूर शिवशरण यांचे एकमेव अर्ज असल्याने त्याची निवड जाहीर करण्यात आली.
तसेच स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समिती तसेच पाणीपुरवठा व जलनिःस्सारण सभापती पदाची निवडणूक प्रक्रिया पार पडली. उपनगराध्यक्ष हे स्वच्छता वैद्यक आणि सार्वजनिक आरोग्य समितीचे पदसिद्ध सभापती असल्याने शिवशरण यांची तर पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समितीसाठी सुधीर काळोखे यांचे एकमेव अर्ज असल्याने काळोखे यांची पाणीपुरवठा व जलनिःस्सारण समिती सभापती साठी निवड जाहीर करण्यात आले.
नगरसेविका शीतल हगवणे, पुनम काळोखे हे अनुपस्थित वगळता मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, नगराध्यक्ष पूजा दिवटे यासह सर्व नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होते.