नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांची निवड लांबणीवर पडली आहे. त्या निवडीसाठी भाजप विधिमंडळ पक्षाची बैठक सोमवारी होणार असल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली होती. मात्र, ती बैठक पुढे ढकलण्यात आली असून आता बुधवारी होण्याची शक्यता आहे. नव्या मुख्यमंत्र्यांबाबत सस्पेन्स कायम असला तरी शपथविधीचा मुहूर्त जवळपास निश्चित झाला आहे.
येत्या गुरूवारी (दि. 20 फेब्रुवारी) सायंकाळी 4.30 वाजता शपथविधी होईल. त्यासाठी रामलीला मैदान हे स्थळ निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत. दिल्लीत नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपची सरशी झाली. तब्बल २६ वर्षांच्या खंडानंतर त्या पक्षाने दिल्ली जिंकली. त्यामुळे भाजप कुणाला मुख्यमंत्री बनवणार याविषयी मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.