पुणे – राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामध्ये जुन्नरमधील 38, आंबेगावमधील 18 आणि खेडमधील 5 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. या निवडणुकीची नोटीस तहसीलदार येत्या गुरुवारी (दि. 18) प्रसिद्ध करणार आहेत.
उमेदवारी अर्ज दि. 24 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत दाखल करता येणार आहे. दरम्यान, या 61 ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदाची निवड थेट मतदारांमधून होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाच्या 17 मे 2022 रोजीच्या आदेशानुसार पावसामुळे निवडणूक कार्यक्रम बाधित होण्याची शक्यता कमी असलेले 51 तालुके निवडून तेथील ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याचबरोबर निवडणूक कार्यक्रमाच्या कोणत्याही टप्प्यावर अतिवृष्टी किंवा पूर परिस्थितीसारखी नैसर्गिक आपत्ती उद्भवल्यास त्याबाबत राज्य निवडणूक आयोगास तत्काळ अहवाल सादर करावा, असे आदेशही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. या ग्रामपंचायतींसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार आहे. तर 19 सप्टेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.