मुंबई – राज्यातील आगामी विधानसभा निवडणूक एकाच टप्प्यात व्हावी, अशी आग्रही भूमिका शिंदेसेना आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या अजित पवार गटाची आहे. तर, कामकाजाच्या दिवशी मतदान घेण्याची मागणी भाजपने केली आहे. राज्यातील विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होणार असल्याचे जवळपास निश्चित मानले जात आहे. त्या निवडणुकीच्या तयारीची चाचपणी करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोग सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्या नेतृत्वाखालील आयोगाने शुक्रवारी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची स्वतंत्रपणे भेट घेतली. त्या बैठकांमध्ये राजकीय पक्षांनी त्यांच्या सूचना मांडल्या. काही महिन्यांपूर्वी राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी ५ टप्प्यांत मतदान झाले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठीही एकापेक्षा अधिक टप्प्यांत मतदान घेतले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
त्या पार्श्वभूमीवर, सत्तारूढ महायुतीचे घटक असणाऱ्या शिंदेसेना आणि अजित पवार गटाने एकाच टप्प्यात निवडणूक घेण्याचा आग्रह धरण्याला महत्व आहे. कमीत कमी टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्याची मागणी शिवसेनेच्या ठाकरे गटाकडूनही करण्यात आली. सार्वजनिक सुट्यांच्या काळात मतदानाचा दिवस आल्यास मतदानाच्या प्रमाणात घट होत असल्याचे साधारणपणे चित्र आहे.
बहुधा त्या बाबीचा विचार करून भाजपने निवडणूक आयोगाकडे कामकाजाच्या दिवशी मतदान घेण्याची मागणी केली. हाऊसिंग सोसायट्यांमध्ये मतदान केंद्रांची व्यवस्था करण्याच्या निर्णयाला कॉंग्रेसने विरोध दर्शवला. इतर पक्षांनीही निवडणूक आयोगाकडे विविध स्वरूपाच्या सूचना आणि मागण्या मांडल्या.