पुणे – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शहरातील गणेश मंडळांना खुश करण्याचे प्रयत्न सत्ताधाऱ्यांनी सुरू केले आहेत. मंडळांना मांडव परवानगी देताना, महापालिकेकडून रनिंग मांडव तसेच स्वागत कमानींना आकारले जाणारे शुल्क महापालिकेच्या स्थायी समितीकडून माफ केले जाण्याची शक्यता आहे.
मुख्यसभा मान्यता देईल या भरवशावर ही मान्यता देण्यात यावी, असा प्रस्ताव स्थायी समितीचे सदस्य हेमंत रासने आणि दीपक पोटे यांनी दिला आहे. बुधवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत त्यावर निर्णय घेतला जाणार आहे. शहरात सुमारे दोन ते अडीच हजार गणेश मंडळे आहेत. त्यांच्या वर्गणीवर मर्यादा आल्याने मंडळाच्या जागेच्या परिसरात स्वागत कमानी तसेच रनिंग मांडव उभारून त्यावर कंपन्या तसेच प्रायोजकांच्या जाहिराती लावल्या जातात. त्यासाठी रस्त्यावर खड्डे घेतले जातात. या खड्ड्यांवर नियंत्रण यावे, या उद्देशाने महापालिकेकडून मांडव परवाना देताना एका स्वागत कमानीसाठी दिवसाला 100 रुपये शुल्क, तर रनिंग मांडवासाठी प्रती 100 फूट अंतरासाठी 50 रुपयांचे शुल्क प्रतीदिन आकारले जाते. अनेक मंडळे एक किलोमीटरपेक्षाही अधिक रनिंग मांडव, तर दोन ते चार कमानी उभारतात. या मंडळाकडून महापालिकेस वर्षाता 3 ते 4 लाखांचे उत्पन्न मिळते. मात्र, आता या दोन्ही बाबींचे शुल्क माफ करून मंडळांना खुश केले जाण्याची शक्यता आहे.
प्रशासन साशंक
मंडळांना आकारण्यात येणारे हे शुल्क वसुलीच्या उद्देशाने नाही, तर त्यांना शिस्त लावण्यासाठी होते असे प्रशासन सांगत आले आहे. हे शुल्क भरावे लागत असल्याने अनेक मंडळे कमानी तसेच रनिंग मांडव मर्यादित ठेवतात. मात्र, कोणतेही शुल्क आकारले नाही तर या रनिंग मांडवासाठी रस्ते खोदले जातील. परिणामी, रस्त्यांची दुरवस्थाही होईल. त्यातच, मुख्यसभेने या पूर्वीच या शुल्काला मान्यता दिली असून आधीचा ठराव निरस्त झाल्याशिवाय याची अंमलबजावणी करता येईल का नाही, याबाबत प्रशासन साशंकता व्यक्त करत आहे.