पहिल्या टप्प्यासाठी आज निवडणूक ! 20 राज्ये, 91 मतदारसंघ, 1279 उमेदवार

आंध्रप्रदेश, ओडिशा, अरूणाचलप्रदेश आणि सिक्कीममध्ये विधानसभेसाठी मतदान

नवी दिल्ली – 17 वी लोकसभा निवडण्यासाठी वीस राज्यांतील 91 मतदारसंघात उद्या गुरूवारी मतदान केले जाणार आहे. सोबतच आंध्रप्रदेश, अरूणाचल प्रदेश, सिक्कीम आणि ओडिशा या चार राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी उद्या मतदान केले जाणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उद्या गुरूवारी मतदान होत आहे. यात महाराष्ट्राच्या विदर्भातील नागपूर, वर्धा, अकोला, भंडारागोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली आणि रामटेकचा समावेश आहे. नागपूर मतदारसंघात राष्ट्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि कॉंग्रेसचे नाना पटोले यांच्यात काट्याची लढत आहे. नितीन गडकरी यांच्याकडे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून बघितले जात असल्यामुळे नागपूर मतदारसंघाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांच्या भाग्याचा फैसला सुध्दा उद्या चंद्रपूरचे मतदार करतील.

पहिल्या टप्प्यात 10 राज्यांतील सर्व जागांसाठी मतदान केले जाणार आहे. यात आंध्रप्रदेश, तेलंगाना, उत्तराखंड, सिक्कीम, नागालॅंड, मेघालय, अरूणाचल प्रदेश, लक्षद्वीप, अंडमान आणि निकोबार आणि मिझोरम या दहा राज्यांचा समावेश आहे. याशिवाय, उत्तरप्रदेशातील आठ, आसाम पाच, बिहार आणि ओडिशा प्रत्येकी चार, पश्‍चिम बंगाल आणि जम्मू काश्‍मीर प्रत्येकी दोन, छत्तीसगड, त्रिपूरा आणि मणिपूरमध्ये प्रत्येकी एका जागेवर मतदान होणार आहे.

यात परराष्ट्र राज्यमंत्री व्ही. के. सिंग, डॉ. महेश शर्मा, रालोद प्रमुख चौधरी अजित सिंग, त्यांचे चिरंजीव जयंत सिंग, माजी राज्यमंत्री संजीव बाल्याण, रामविलास पासवान यांचे चिरंजीव चिराग पासवान आणि मनिष खंडूडी यांच्या नशिबाचा उद्या फैसला होणे आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.