नवी दिल्ल्ली ( Congress President Election ) – २०१९ लोकसभा निवडणुकांमधील काँग्रेसच्या मानहानीकारक पराभवाची जबाबदारी स्वीकारत राहुल गांधी यांनी पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. बरेच दिवस हे नाट्य रंगल्यानंतर व अनेक वरिष्ठ नेत्यांनी गळ घालून देखील राहुल गांधींनी अध्यक्षपदाची जबाबदारी पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला.
नाईलाजाने पक्षाच्या अंतरिम अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड करण्यात आली होती. यानंतरही विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या पदरी निराशाच पडली. यामुळे पक्षाला आता पूर्णवेळ अध्यक्ष मिळावा अशी मागणी जोर धरू लागली होती. परंतु काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक ( Congress President Election ) आता पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.
काँग्रेसच्या संसदीय समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती एएनआय या वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. देशातील करोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक घेणे उचित ठरणार नाही, असा निर्णय संसदीय समितीच्या बैठकीमध्ये घेण्यात आला.
काँग्रेसच्या मागील संसदीय समितीच्या बैठकीमध्ये पक्षांतर्गत निवडणूक समितीने अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी २३ जून ही तारीख सुचवली होती, मात्र आता ही निवडणूक पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली आहे. अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम काँग्रेस निवडणूक समितीमार्फत घेण्यात येईल अशी माहितीही पक्षांतर्गत सूत्रांकडून मिळाली आहे.
Elections for Congress President further postponed. Due to #COVID19 situation, it has been decided in CWC meet to postpone it as it won’t be correct to hold elections in this scenario. In last CWC meet, Central Election Authority had proposed 23rd June as the poll date: Sources pic.twitter.com/Rj42TXykCr
— ANI (@ANI) May 10, 2021