नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्षपद (Congress President) निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. सोनिया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली आज कॉंग्रेस कार्यकारीणीची बैठक संपन्न झाली. यावेळी निवडणुकीच्या तारखांची घोषणा करण्यात आली आहे. त्यानुसार, 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. अर्ज भरण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. त्याची अंतिम तारीख 30 सप्टेंबर निश्चित करण्यात आली आहे. 17 ऑक्टोबरला मतदान होणार असून 19 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे. या बैठकीला राहुल गांधी, प्रियांका गांधी यांसह कार्यकारीणीतील इतर सदस्य उपस्थित होते.
दरम्यान, कॉंग्रेसने काही दिवसांपूर्वी नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया पुढे ढकलली होती. कॉंग्रेसने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये जाहीर केले होते की, या वर्षी 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर दरम्यान आपल्या नवीन अध्यक्षाची निवडणूक होणार आहे.
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींना पुन्हा कॉंग्रेस अध्यक्ष होण्यासाठी जाहीरपणे आग्रह केला आहे. मात्र, या विषयावर अनिश्चितता कायम आहे. त्याचवेळी राहुल गांधी अध्यक्ष होणार नाही या भूमिकेवर ठाम असल्याचे पक्षातील अनेक सूत्रांचे म्हणणे आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पक्षाचा सलग दुसऱ्यांदा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी कॉंग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. (election-for-congress-president-post-to-be-held-on-17th-october-counting-will-be-done-on-19th-october)