निवडणूक साहित्य विक्रेते सज्ज

निवडणुकीची तारीख घोषित होण्याकडे लक्ष

– रोहन मुजूमदार 

आघाडी आणि युतीचा घोळ संपला आहे. आता थोड्याफार जागा वाटपावरून सुरू असलेल्या वाटाघाटीमुळे आघाडी, युतीसह अन्य राजकीय पक्षांचे आणि अपक्ष उमेदवार घोषित झालेले नाहीत. मात्र, प्रचार साहित्य तयार करणारे आणि विक्रेते जोरदार कामाला लागले आहेत. आता काही दिवसांतच निवडणुकांची घोषणा होईल आणि कोट्यवधी रुपयांची उलाढालीस सुरुवात होणार आहे, त्यामुळे प्रचार साहित्याची विक्री करणारे सज्ज झाले असून ते आता फक्‍त उमेदवार घोषित होण्याची वाट पाहात आहेत. त्यांची यंत्रणा “फिक्‍स’ उमेदवारांचे निवडणूक साहित्य बनविण्यात बिझी आहेत.

कुठलीही निवडणूक म्हटली की विविध राजकीय पक्षातील उमेदवारांचा प्रचार आणि प्रसारावर जोर असतो तेवढाच प्रचार साहित्यावर सुद्धा असतो. निवडणुकीची तारीख घोषित होताच विविध राजकीय पक्ष प्रचार साहित्याची मागणी करून निवडणुकीच्या किमान महिनाभर अगोदर साहित्य मागून घेतात आणि जिल्हा आणि तालुका पातळीवर वितरित करीत असतात. मात्र, यावेळी अद्याप निवडणुकीची तारीख घोषित झाली नसली तरी प्रचार साहित्य तयार करणारे निवडणूक आयोगाच्या घोषणेकडे लक्ष ठेवून आहेत. अडगळीत पडलेले बॅनर, बिल्ले, झेंडे, टोप्या, दुपट्टे, अंगठी, फुगे, राष्ट्रीय नेत्यांचे छायाचित्र असलेले फलक, चार व दुचाकी वाहनांवर लावण्यात येणारे झेंडे आदींची मागणी व खप वाढणार आहे. जितके पक्ष आणि उमेदवार जास्त तेवढी विक्री होत असते. यंदा नियमित साहित्यांपेक्षा वेगळे काय देता येईल याचाही विचार केला जात आहे.

जसजशी निवडणूक जवळ येते तसा प्रचार साहित्याची निर्मिती वेगाने केली जाते. अद्याप निवडणुका जाहीर न झाल्याने अद्याप हवी तशी मागणी नाही. आघाडी आणि युतीच्या जागेचा वाटपाचा तिढा सुटला की तत्काळ प्रचार साहित्य निर्मिती आणि विक्री झपाट्याने होणार आहे. प्रस्थापित राजकीय पक्षाच्या साहित्याची निर्मिती केली जात असली तरी अपक्ष उमेदवारांना मात्र, जोपर्यंत चिन्ह वाटप केले जात नाही तोपर्यंत त्यांच्याकडून प्रचार साहित्याची मागणी होत नाही. संगणकामुळे आज मोठमोठे बॅनर तयार करणे सोपे झाले असले तरी त्याला काही वेळ द्यावा लागतो. शिवाय विविध राजकीय पक्षाच्या उमेदवारांजवळ वेळ कमी मिळणार असल्याने इच्छुकांनी आतापासून डिझाईन “फायनल’ करून ठेवल्या आहेत. निवडणुकीच्या काळात मुद्रण व्यवसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असते. त्यामुळे हे विक्रेते निवडणूक केव्हा घोषित होणार याकडे डोळे लावून बसलेले आहेत.

सध्या छोट्या-मोठ्या साहित्यांना मागणी
निवडणूक तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्षांचे प्रचाराचे साहित्य प्रिंटिंगला येत असते. सध्या छोट्या-मोठ्या सभा, रॅली, भूमिपूजन, उद्‌घाटने यासाठी झेंडे, टोप्या, दुपट्टे, बॅनर अशा छोट्या-मोठ्या साहित्यांना मागणी आहे. मात्र, एकदा का निवडणूक जाहीर झाली की या विक्रेत्यांना ऑर्डर पूर्ण करण्यासाठी रात्रीचा दिवस करावा लागणार हे निश्‍चित आहे.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)