निवडणूक प्रशासनाचा तुघलकी कारभार; गुन्हे दाखल करण्याची नोटीस
नगर – पारदर्शक व खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका पार पाडण्याचा दावा करणाऱ्या निवडणूक प्रशासनाच्या एक-एक सुरस कथा समोर येत आहेत. एका निवृत्त शिक्षिकेला निवडणुकीची ड्युटी देण्यात आली, तर दुसऱ्या एका दिव्यांग शिक्षिकेला मतदान अधिकारी व बीएलओ अशा दुहेरी ड्युटी देण्याचा पराक्रम नगर तहसील कार्यालयाने केला आहे.
आंधळं दळतयं अन् कुत्र पीठ खातयं अशी अवस्था निवडणूक प्रशासनाची झाली आहे. या विस्कळीत व मनमानी कारभाराचा मात्र संबंधित कर्मचाऱ्यांना नाहक मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. श्रीमती निला बबनराव पठारे या उपमुख्याध्यापिका दि.30 सप्टेंबर रोजी नगर तालुक्यातील बुरडगाव येथील जिल्हा प्राथमिक शाळेतून निवृत्त झाल्या.
निवृत्त कर्मचाऱ्याला निवडणूक ड्युटी दिली जात नसते.असे असताना पठारे यांना विधानसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी क्रमांक 2 या कामाच्या प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आले. पठारे यांनी आपण निवृत्त आहोत म्हणून या पत्राकडे दुर्लक्ष करत पहिल्या दोन्ही प्रशिक्षणाला हजेरी लावली नाही. त्यामुळे त्यांना नगर शहर विधानसभेच्या सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा नगर तहसीलदारांनी चक्क फौजदारी गुन्हे दाखल करण्याची नोटीस दिली आहे.
तर दुसरीकडे नगर तालुक्यातीलच एका जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर कार्यरत मात्र दिव्यांग असलेल्या महिला शिक्षिकेला राहुरी मतदारसंघात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) म्हणून नगर तहसीलच्या माध्यमातून ड्युटी देण्यात आली आहे.मात्र,ती न स्वीकारल्यामुळे नगर शहराच्याच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा नगर तहसीलदार यांच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे यांनी त्यांना फौजदारी गुन्हे दाखल करण्यासह निलंबनाची नोटीस दिली आहे.
दुसरीकडे याच शिक्षिकेला पारनेर-नगर मतदारसंघात मतदान अधिकारी क्रमांक 2 या कामाच्या प्रशिक्षणाचे पत्र देण्यात आल होते.दिव्यांग कर्मचाऱ्याला निवडणुकीचे कामकाज न देण्याचे निवडणूक आयोगाचेच निर्देश असताना अधिकाऱ्यांनी निवडणुुकीचे काम दिले आहे. राष्ट्रीय कर्तव्य व निवडणूक आयोगाचे निर्देश मानून दिव्यांग असतानाही या शिक्षिकेने सदर निवडणूक कामाचे दोन्ही प्रशिक्षण पूर्ण केले.
यातील परत गंमत अशी की निवडणूक प्रक्रियेचे काम ज्या कर्मचाऱ्याला आहे त्याला बीएलओचा पदभार दिला जात नाही वा जो बीएलओ आहे त्याला मतदान प्रक्रियेचे काम दिले जात नाही असे असताना या दिव्यांग शिक्षिकेला दोन-दोन ड्यूटी देण्याचा तुघलकी कारभार तर प्रशासनाने केलाच पण त्या दिव्यांग महिला असल्याचे त्यांनी प्रमाणपत्र सादर करूनही त्यांना या जबाबदाऱ्या देण्याचे काम निवडणूक प्रशासनाने केले.
ज्यांनी या नोटिसा दिल्या आहेत ते नगर शहर मतदारसंघाचे सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा तहसीलदार उमेश पाटील यांनी सांख्यिकी विभागाकडून आलेल्या माहितीवर ही कारवाई केली आहे. संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांशी बोलून त्यात दुरुस्ती केली जाईल.