निवडणूक आयोगाचा नवा फंडा… 

मतदानासाठी येणाऱ्या महिला मतदारांना देणार सॅनेटरी पॅड

मुंबई – लोकसभा निवडणूकीमध्ये जास्तीत जास्त मतदारांनी सहभाग घ्यावा यासाठी जनजागृती केली जात असतानाच आता महिला मतदारांची संख्या वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने नवा फंडा शोधून काढला आहे. मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड देण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. हा प्रयोग प्रथमच मुंबईच्या उपनगरातील सखी मतदान केंद्रावर रावबला जाणार आहे.

लोकसभा निवडणूकीसाठी महाराष्ट्रातील शेवटच्या टप्प्यासाठी 29 एप्रिल रोजी मतदान होत आहे. लोकशाहीच्या या उत्सवादरम्यान मतदानासाठी महिला मतदारांनी जास्तीत जास्त सहभाग घ्यावा यासाठी त्यांना सॅनेटरी पॅड देण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. मतदानासाठी “सखी मतदान केंद्र’ उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्रावर अधिकाऱ्यापासून ते कर्मचाऱ्यापर्यंत सर्व मतदान प्रक्रिया महिलांद्वारे पार पाडली जाते. अशा केंद्रावरच मतदानासाठी येणाऱ्या महिलांना सॅनेटरी पॅड दिले जाणार आहेत.

हा प्रयोग मुंबईच्या 26 विधानसभा मतदारसंघात केला जाणार आहे. त्यासाठी कुर्ला, अंधेरी आणि बोरिवली असे तीन प्रशासकिय उपविभाग करण्यात आले आहेत. केंद्रिय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणूकीदरम्यान राज्यातील 277 विधानसभा मतदारसंघामध्ये सुमारे 300 सखी मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. उपनगरातील मतदान केंद्राबाहेर मतदारांना आकर्षित करण्यासाठी सुरेख रांगोळी काढली जाणार असून विविध कलाही सादर केल्या जाणार आहेत, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. एवढेच नव्हे तर महिला आणि पुरूष मतदारांच्या मतदान केंद्रावर मतदारांसाठी कोल्डड्रिंक्‍सही ठेवण्यात येणार असल्याची माहिती या अधिकाऱ्याने दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.