पक्ष, उमेदवारांच्या खर्चावर निवडणूक आयोगाची करडी नजर

सोरमारे ः उमेदवारांनी दैनंदिन खर्च सादर करणे बंधनकारक

नगर – लोकसभा निवडणूक काळात उमेदवार तसेच राजकीय पक्षांना दैनंदिन स्वरुपात खर्च अहवाल सादर करावा लागणार आहे, त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना आणि निर्देशांचे पालन करावे. तसेच दैनंदिन खर्च सादर करावा. राजकीय पक्ष आणि उमेदावारांच्या खर्चावर करडी नजर असल्याचे आणि त्यासाठी खर्च सनियंत्रण समिती कार्यरत असल्याचे अपर जिल्हाधिकारी तथा – शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पिराजी सोरमारे यांनी सांगितले.

राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी खर्चविषयक नियमांची आणि आयोगाने घालून दिलेल्या नियम आणि सूचनांची माहिती करुन घ्यावी. संबंधित उमेदवारांना रोजच्या रोज खर्चाची माहिती खर्च सनियंत्रण समितीकडे देणे आवश्‍यक आहे. याशिवाय, उमेदवाराचे स्वतंत्र खाते असणे आवश्‍यक आहे. निवडणूक आयोगाने जिल्हा स्तरावर विविध बाबींसाठी ठरवून दिलेल्या दरकरारानुसार उमेदवारांच्या खर्चाची नोंद घेण्यात येईल.त्यांच्या प्रचारासाठी केलेल्या खर्चाची माहिती वस्तुनिष्ठपणे देणे आवश्‍यक आहे. निवडणूकीसाठीचा खर्च उमेदवाराने अर्ज भरण्यापूर्वी नवीन तयार केलेल्या बॅंक खात्यातूनच केला जाणे आवश्‍यक असल्याचे त्यांनी सांगितले.

राजकीय पक्ष अथवा उमेदवारांमार्फत काढल्या जाणाऱ्या वाहन प्रचारफेरी, मेळावा, मिरवणूक याचा खर्च त्यांनी नोंदवला पाहिजे. निवडणूक यंत्रणेने भरारी पथक, व्हीडिओ टीम, खर्च नियंत्रण पथक स्थापन केले आहे. ही पथके अशा खर्चाकडे लक्ष ठेवून असणार आहेत. त्यामुळे उमेदवारांनी त्याची वस्तुनिष्ठ माहिती द्यावी, असे ते म्हणाले. यावेळी निवडणूक आयोगाचे खर्चासंदर्भातील नियम, कायदे, कायद्याचा भंग केल्यास होणारी कार्यवाही याची माहिती उमेदवार आणि राजकीय पक्षांनी घ्यावी आणि त्याप्रमाणे कार्यवाही करावी, असे ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.