Abdul Sattar | मंत्री अब्दुल सत्तार यांना निवडणूक आयोगाने दणका दिला आहे. शिंदे गटाकडून सिल्लोड येथून उमेदवारी मिळाल्यानंतर अब्दुल सत्तार यांनी उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रात मालमत्तेची माहिती लपवल्याची माहिती समोर आली आहे. मालमत्तेद्दल खोटी माहिती दिल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महेश शंकरपेल्ली आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत केला आहे. मंगेश शंकरपेल्ली यांच्या तक्रारीची दखल निवडणूक आयोगाने घेतली आहे.
सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अब्दुल सत्तार यांनी मालमत्तेची माहिती लपवली असल्याच्या तक्रारीची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घेतली. त्यानुसार मालमत्तेची माहिती लपवल्याची तक्रार झाल्यानंतर निवडणूक आयोगाने ई- मेलद्वारे जिल्हाधिकारी व सिल्लोड येथील निवडणूक अधिकारी यांना २४ तासांच्या आत अहवाल पाठवण्याचे निर्देश दिले आहेत.
अब्दुल सत्तार यांनी सादर केलेल्या शपथपत्रांमध्ये खोटी, दिशाभूल करणारी माहिती आहे. त्यामुळे अब्दुल सत्तार यांचा अर्ज फेटाळण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले होते. याची दखल थेट निवडणूक आयोगाने घेतली असून आता अब्दुल सत्तार यांच्यावर काय कारवाई केली जाणार हे पहावे लागणार आहे.