एडीबीच्या उपाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारणार
नवी दिल्ली -निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांनी मंगळवारी पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे देशाचे पुढील मुख्य निवडणूक आयुक्त बनण्याची त्यांची संधी हुकली. आता ते आशियाई विकास बॅंकेच्या (एडीबी) उपाध्यक्षपदाची सुत्रे स्वीकारण्यास सज्ज झाले आहेत.
फिलिपाईन्सस्थित एडीबीच्या उपाध्यक्षपदी लवासा यांची मागील महिन्यात नियुक्ती झाली. पुढील महिन्यात ते नवी जबाबदारी स्वीकारतील. नव्या नियुक्तीच्या पार्श्वभूमीवर लवासा यांनी राष्ट्रपती भवनला राजीनामापत्र पाठवले. त्यातून त्यांनी 31 ऑगस्टला पदमुक्त करण्याची विनंती केली. भारतीय प्रशासकीय सेवेतील (आयएएस) 1980 च्या तुकडीचे अधिकारी असणाऱ्या लवासा यांची जानेवारी 2018 मध्ये निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती झाली.
विद्यमान मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांचा कार्यकाळ पुढील वर्षी एप्रिलमध्ये समाप्त होणार आहे. त्यानंतर ज्येष्ठतेनुसार लवासा यांच्याकडे सुत्रे गेली असती. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांचा दोन वर्षांपेक्षा अधिक कार्यकाळ शिल्लक होता. मागील वर्षीच्या लोकसभा निवडणुकीवेळी लवासा चर्चेचा विषय बनले होते. त्यावेळी निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे तत्कालीन अध्यक्ष अमित शहा यांना आचारसंहिता भंग प्रकरणी क्लीन चिट दिली होती. त्याविषयी लवासा यांनी असहमती दर्शवली होती.