विधानसभा निवडणूकीसाठी निवडणूक आयोग सज्ज

 ईव्हिएम सुरक्षित असल्याचा दावा

मुंबई: चौदाव्या विधानसभा निवडणुकीसाठी इलेक्‍ट्रॉनिक वोटींग मशीन (ईव्हीएम), अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपलब्धता, प्रशिक्षण आदी पूर्वतयारी झाली असून निष्पक्ष, निर्भय वातावरणात पारदर्शी पध्दतीने निवडणूक पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी बलदेव सिंग यांनी बुधवारी येथे दिली.

राज्य विधानसभेची निवडणूक पुढील महिन्यात अपेक्षित आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पुढील आठवड्यात निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होण्याची शक्‍यता आहे. यापाश्वभूमीवर बलदेव सिंग यांनी आज पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणूक पूर्वतयारीची माहिती दिली.

ईव्हीएम पूर्णत: सुरक्षित, सक्षम आणि दोषविरहित असून कोणत्याही बाह्य हस्तक्षेपाद्वारे त्याची सुरक्षितता भेदणे अशक्‍य आहे. ईव्हीएमला सुरक्षिततेचा ‘हाय्येस्ट सिक्‍युरीटी प्रोटोकॉल’ आहे. विविध न्यायालयीन प्रकरणांमध्ये या यंत्रणेला योग्य ठरविण्यात आले आहे. तरीही या यंत्रणेबद्दल अप्रचार आणि अफवा पसरविल्या जात असून त्यावर मतदारांनी विश्वास ठेवू नये, असे आवाहनही सिंग यांनी केले.

मतदार याद्यांच्या पुनरिक्षणाचा कार्यक्रम राबविण्यात आल्यानंतर 31 ऑगस्ट 2019 रोजी अंतिम मतदार यादी प्रकाशित करण्यात आली. असे असले तरी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसापूर्वी 10 दिवस आधी मतदार नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे अजूनही नोंदणी करू न शकलेल्या मतदारांना आपले नाव नोंदण्याची संधी आहे, असे सिंग म्हणाले. राज्यात लोकसभा निवडणुकीला 95 हजार 473 मतदान केंद्रे होती. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्राची निश्‍चिती करण्यात येत असून लोकसभेच्या तुलनेत विधानसभेला मतदान केंद्रांची संख्या 700 ते 800 ने वाढण्याची शक्‍यता आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

10 लाख 75 हजार मतदार वाढले
31 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीनुसार राज्यात एकूण 8 कोटी 94 लाख 46 हजार 211 मतदार आहेत. 15 जुलै, 2019 रोजी प्रसिद्ध झालेल्या प्रारुप मतदार यादीनुसार 4 कोटी 63 लाख 27 हजार 241 पुरुष, 4 कोटी 22 लाख 57 हजार 193 महिला आणि 2 हजार 527 तृतीयपंथी असे एकूण 8 कोटी 85 लाख 86 हजार 961 मतदार होते. 15 जुलैनंतर सुमारे 10 लाख 75 हजार 528 इतके नवीन मतदार यादीमध्ये समाविष्ट झाले आहेत; तर 2 लाख 16 हजार 278 इतके मतदार वगळण्यात आले आहेत.

पूरग्रस्तांना मोफत ओळखपत्र
कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्‌यातील पुरामुळे कागदपत्रे नष्ट झालेल्या मतदारांना विनामूल्य मतदार ओळखपत्र देण्याच्या सूचना जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या असून त्याची कार्यवाही सुरू असल्याचे सिंग यांनी सांगितले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×