निवडणूक आयोगाने केली घटनेची चेष्टा – कॉंग्रेस

लवासांच्या प्रकरणात कॉंग्रेसने केली टीका

नवी दिल्ली – निवडणूक आयोगाने निवडणूक आयुक्त अशोक लवासा यांचे मोदींच्या प्रकरणातील विरूद्ध मतप्रदर्शन आयोगाच्या आदेशाला जोडण्यास नकार दिला आहे. या विषयावरून कॉंग्रेसने निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर जोरदार आक्षेप नोंदवला आहे. त्यांनी म्हटले आहे की आयोगाची ही कृती म्हणजे घटनेचीच पायमल्ली असून त्यांनी आता आयोगात गुप्तता पाळण्याचा नवीन काळा पायंडा पाडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आचारसंहिता भंगाच्या ज्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे दाखल झाल्या होत्या त्यातील प्रत्येक प्रकरणात आयोगाने त्यांना क्‍लीन चीट दिली आहे. मात्र या निर्णयाच्यावेळी तीन निवडणूक आयुक्तांपैकी अशोक लवासा यांनी मोदींना काही प्रकरणात क्‍लीन चीट देण्यास नकार दिला होता. व मोदींच्या विरोधात त्यांनी आपला अभिप्राय स्पष्ट शब्दात नोंदवला होता. पण त्यांचा हा अभिप्राय निवडणूक आयोगाने केवळ नोंदवून घेतला आहे, तो जाहीर करण्यास मात्र नकार दिला आहे.

निवडणूक आयोगात सध्या सुनिल अरोरा हे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत आणि अशोक लवासा आणि सुशिल चंद्रा हे अन्य दोन निवडणूक आयुक्त आहेत. लवासांच्या बाबतीत अन्य दोन आयुक्तांनी असा निर्णय घेतला आहे की त्यांनी जरी आयोगाच्या एखाद्या निर्णयाच्या विरोधात अभिप्राय दिला असेल तर तो अभिप्राय आयोगाच्या रेकाडॅवर नोंदवून घेतला जाईल पण आयोगाच्या आदेशात तो जोडला जाणार नाही. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला लवासा यांनी आक्षेप घेतला आहे. त्यावरून कॉंग्रेसने निवडणूक आयुक्तांच्या कार्यपद्धतीवर टीका केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.