अमरावती -निवडणूक आयोगाने शुक्रवारी आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव बदलले. अनिलचंद्र पुनिथा यांना मुख्य सचिव पदावरून हटवून त्यांच्या जागी एल.व्ही.सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. पुनिथा मे महिन्याच्या अखेरीस सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांची नियुक्ती निवडणूक कार्याशी संबंध नसलेल्या पदावर करण्याचा आदेशही निवडणूक आयोगाने दिला आहे.
आयोगाने याआधी आंध्रच्या गुप्तचर विभागाच्या महासंचालकांच्या बदलीचा आदेश दिला होता. त्याला पुनिथा यांनी आंध्र उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दरम्यान, मुख्य सचिवांशी संबंधित घडामोडीमुळे आंध्रातील सत्तारूढ तेलगू देसम पक्ष (टीडीपी) संतप्त होण्याची शक्यता आहे. आंध्र सरकार आणि मोदी सरकारमध्ये अनेकदा संघर्षाची स्थिती पाहावयास मिळाली. त्याला आणखी खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.