कोलकाता – पश्चिम बंगालमध्ये राजकीय सभांदरम्यान कोविडच्या निकषांचे पालन न केल्याबद्दल तीव्र संताप व्यक्त करीत निवडणूक आयोगाने गुरुवारी रोड शो आणि सायकल, दुचाकी, वाहनांच्या रॅलीसह प्रत्यक्ष प्रचारावर पूर्ण बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
पश्चिम बंगाल विधानसभेच्या निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी आज तब्बल 79 टक्के मतदान झाले. कोविड-19 चा वाढत प्रादुर्भाव लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही उद्याच्या प्रचारसभा रद्द केल्या असून ते आता आभासी माध्यमातून जनतेशी संवाद साधणार आहेत.
पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढायला लागल्यामुळे निवडणूक आयोगाला हे पाऊल उचलावे लागले आहे. आज एका दिवसात पश्चिम बंगालमध्ये 9,819 रुग्णांना करोनाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले आहे. देशभरामध्ये गेल्या 24 तासांत 2 लाख 95 हजार जणांना कोविड-19 चा संसर्ग झाला आहे. तर 2 हजार 23 जणांचा मृत्यू झाला आहे.