मुंबई : विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडाळी केली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून त्यांच्या पक्षाचे नाव तसेच चिन्ह देखील गेले. त्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना वेगळे चिन्ह तसेच नाव देखील दिले. त्यांना देण्यात आलेल्या मशाल या चिन्हावरच त्यांनी लोकसभा निवडणूक लढवली.
मात्र, या चिन्हामध्ये काही बदल करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्याला निवडणूक आयोगाने मान्यता दिली असून विधानसभा निवडणुकीपूर्वी हे नवे सुधारित चिन्ह पक्षाला देण्यात आले आहे. नव्याने अस्तित्वात आलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह देण्यात आले.
मात्र, आईस्क्रीमच्या कोनासारखे हे चिन्ह दिसत असल्याचे विरोधकांनी टीकेची झोड उठवली होती. त्यात आता बदल केला असून ती आता बॅटरीसारखी दिसणार आहे. वरती पेटत्या ज्वाळा आणि खाली त्याला बॅटरीसारखा आकार देण्यात आला आहे. तसेच या चिन्हाच्या आत असलेला भगवा रंग काढण्यात आला आहे.