मुंबई – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने मुंबई वगळता सर्व महापालिकांमध्ये 3 सदस्यीय प्रभाग रचनेची घोषणा केली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार मुंबई वगळता इतर सर्व महापालिकांच्या निवडणुकीत 3 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल तर मुंबईत एक वॉर्ड पद्धत असेल.
नगरपालिका आणि नगरपरिषदेत मात्र 2 सदस्यीय प्रभाग पद्धत असेल. नगरपंचायतीलाही 1 सदस्यीय पद्धत असणार आहे. मात्र, महापालिकेतील 3 सदस्यीय प्रभार रचनेला कॉंग्रेसचा विरोध आहे. दोन सदस्यीय प्रभाग रचना असावी असा ठरावही कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. त्यानंतर आता पुन्हा एकदा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रभाग रचनेत बदल होण्याचे संकेत दिले आहेत.
महापालिकेत 2 सदस्यीय प्रभाग रचना असावी या मुद्द्यावर पुन्हा चर्चा होऊ शकते. मात्र, 3 सदस्यीय प्रभाग रचनेचा निर्णय झालेला आहे. याला कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस असं बंधन घालू नका. बुधवारी होणाऱ्या बैठकीत यावर परत एकदा चर्चा होऊ शकते.
आमच्या कार्यकारिणी बैठकीत दोन सदस्यीय प्रभाग असावा अशी चर्चा झाली आहे. मंत्रिमंडळाचा निर्णय झाला असला तरी परत चर्चा होऊ शकते, अशा शब्दात प्रभाग रचनेत पुन्हा बदल होऊ शकतात, असे संकेत बाळासाहेब थोरात यांनी दिले आहेत.