सार्वत्रिक निवडणूक व संगणकीय तंत्रज्ञान

– डॉ. दीपक शिकारपूर

इलेक्‍ट्रॉनिक्‍स आणि संगणकीय तंत्रज्ञानाच्या जादूई स्पर्शापासून अलिप्त असलेली कोणतीही बाब आता दाखवता येणार नाही! अत्यंत पारंपरिक स्वरूपाच्या क्षेत्रांमध्येही संगणकीय तंत्राने नुसता प्रवेशच केलेला नाही तर त्यावर वर्चस्व राखले आहे आणि त्यामुळे संबंधित कामांमध्ये गती, सफाईदारपणा आणि सुरक्षितताही आली आहे. सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला विषय म्हणजे देशातील सार्वत्रिक निवडणुका – ह्यावरही संगणकीय तंत्र आणि उपकरणांनी स्वतःचा ठसा उमटवला आहे! प्रत्यक्ष मतदानापासून विजयी उमेदवाराबाबतचे अंदाज वर्तवण्यापर्यंतच्या अनेक पैलूंमध्ये हे तंत्रज्ञान समाविष्ट झालेले आढळते.

मतदान करण्यापासूनच सुरूवात करू – “इव्हीएम’ उर्फ इलेक्‍ट्रॉनिक व्होटिंग मशिनबाबत आरंभी बऱ्याच शंका व्यक्त झाल्या व आपल्याकडील अशिक्षित आणि अर्धशिक्षितांना हे तंत्र जमेल काय अशी विचारणा झाली. परंतु सुरूवातीपासून इव्हीएमच वापरत असल्याप्रमाणे लोक सराईतपणे मतदान करताना दिसतात! मतमोजणी देखील अतिशय वेगाने, अचूकतेने आणि गैरप्रकार होऊ न देता करणे इलेक्‍ट्रॉनिक तंत्रांमुळे शक्‍य झाले आहे.

सर्वच उमेदवारांच्या मतदानाआधीच्या प्रचाराची धामधूम आता सोशल मीडियामुळे चांगलीच बदलली आहे! लोकांचे मोठ्या संख्येने इंटरनेटवरील अनेक सोशल साईटवरून एक अस्तित्व’ तयार झाले आहे.

इंटरनेटवरील सोशल मीडिया हा जगभरातील नागरिकांच्या आयुष्यातील व समाजातील एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे.. सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करून अनेकांना लोकांपर्यंत आपले विचार, मते, माहिती पोचविण्याचा एक नवा मार्ग पुढे आला आहे. उमेदवाराची प्रतिमा, त्याने केलेली विधाने अशांसारख्या बाबींना एफबी आणि ट्‌विटरवर जास्तीतजास्त लाइक्‍स आणि शेअरिंग मिळवणे हे प्रत्यक्ष मिरवणुका, पोस्टर्स आणि हॅंडबिलांइतकेच किंवा त्यांपेक्षाही महत्त्वाचे मानले गेले आहे!! स्मार्टफोन आणि इतर तंत्रांच्या प्रसाराच्या विलक्षण वेगामुळे हे शक्‍य झाले आहे – अगदी गेल्या निवडणुकीतही सोशल मीडियाची इतकी हवा नव्हती. स्मार्टफोनमधील सोशल संवादमाध्यमे, टीव्ही / वृत्तपत्रे इ. पेक्षा सहज प्राप्त होणारी, कमी खर्चाची आणि हाताळायला सोपी असल्याने जगभरातील अधिकाधिक स्मार्टफोनधारक बातम्या मिळवण्यासाठी त्यांचा वापर मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत

निवडणुकांमध्ये गैरप्रकार होणे आपल्याकडे नवीन नाही. परंतु त्यांची खबर – चित्रफितीच्या रूपातील पुराव्यासहित! – तत्काळ संबंधितांपर्यंत पोचवणे आता स्मार्टफोन आणि त्यामध्ये समाविष्ट असलेल्या इंटरनेटमुळे शक्‍य झाले आहे. ह्याला साधारणतः “स्टिंग ऑपरेशन’ असे म्हटले जाते.

मतदानाआधी आणि निकालापूर्वीच्या दिवसांत टीव्हीवरून अंदाज वर्तवण्याला अगदी जोर येतो. ह्या कल-चाचण्या (ओपिनियन पोल्स) मतदारांना प्रभावित करू शकतात का? हे अंदाज खरे आणि भरवशाचे असतात की फुगवलेले आणि फेरफार केलेले? त्यांवर बंदी घालावी का? इ. मुद्‌द्‌यांची चर्चा – सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून, आपापल्या सोयीनुसार – सतत घडवली जाताना आपण पाहतोच. तसेच ऑनलाइन सॅंपलिंग पद्धतीनेही मतदारांच्या मनाचा कल, त्यांना भावणारे आणि खुपणारे मुद्दे अशा बाबींचे चित्र मिळवता येते. निवडणुकांमध्ये पक्ष वा उमेदवारांची विचारसरणी, देशहित ह्यांपेक्षा जाती-धर्माची गणिते वरचढ ठरत असल्याने आणि मतदारही बरेचदा फक्त तत्कालिक फायद्याच्या मागे लागल्यामुळे मतदान तसेच त्याआधीच्या व नंतरच्या प्रक्रिया विलक्षण गुंतागुंतीच्या बनल्या आहेत. परंतु संगणकीय तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून सर्व प्रक्रिया अधिकाधिक पारदर्शक व लोकाभिमुख बनवणेही सहजशक्‍य आहे!

Leave A Reply

Your email address will not be published.