नवी दिल्ली – कॉंग्रेसच्या माजी अध्यक्षा आणि सर्वात प्रदीर्घ काळ या ऐतिहासिक पक्षाचे अध्यक्षपद भूषवण्याचा मान पटकावणाऱ्या सोनिया गांधी आताच्या गुजरात आणि हिमाचल प्रदेश या दोन्ही राज्यांच्या प्रचारात एकदाही दिसल्या नाहीत. पक्षाच्या स्टार प्रचारकांची जी यादी देण्यात आली होती, त्यात अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यानंतर सोनिया गांधी यांचेच नाव होते.
मात्र तरीही सोनिया गांधी प्रचारापासून लांबच राहील्या. अर्थात आम्ही प्रोटोकॉल म्हणून त्यांचे नाव यादीत समाविष्ट करतो. मात्र प्रचारात उतरायचे की नाही याचा निर्णय त्याच घेतात असे पक्षाच्या सूत्रांनी म्हटले आहे.
पण 77 व्या वर्षांत पदार्पण करत असलेल्या गांधी या प्रकृती अस्वास्थ्यामुळेच प्रचारापासून लांब राहत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. केवळ आताच नाही तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीपासूूनच कॉंग्रेसला सोनियांच्या निवडणुकीतील प्रत्यक्ष सहभागाची उणीव जाणवत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
उपलब्ध माहितीनुसार गेल्या पाच ते सहा वर्षांत सोनिया यांची एकही सभा झालेली नाही. मागच्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी एकही प्रचारसभा घेतली नव्हती. 11 एप्रिल रोजी त्यांनी रायबरेली मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्या माध्यमांशी बोलल्या होत्या एवढेच. 14 डिसेंबर 2019 रोजी दिल्लीत रामलिला मैदानावर भारत बचाओ रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी छोटेखानी भाषण केले होते.
येत्या 9 तारखेला त्या वयाची 76 वर्षे पूर्ण करून 77 व्या वर्षात पदार्पण करतील. पक्षातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार त्यांना उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी 2017 मध्ये पहिल्यांदा प्रकृती अस्वास्थ्याचा त्रास जाणवला. आता त्या खासगी आणि अन्य कामांसाठी प्रवास करतात. पक्षाचे कार्यक्रम आणि चिंतन शिबिरात मार्गदर्शनही करतात. मात्र निवडणूक प्रचारसभांपासून त्या लांबच गेल्या आहेत. त्या सक्रिय राजकारणातून आता बाजूला होत असल्याचे त्यांच्य चाहत्यांना वाटते आहे.