बीजिंग – चीनमधील सर्वात वयोवृद्ध आणि १९वे, २०वे अन् २१वे अशी तीन शतके पाहणाऱ्या महिलेचे निधन झाले आहे. अलिमिहान सेयिती या 135 वर्षांच्या होत्या. शिनजियांग प्रांतात राहणारे अलिमिहान या मूळच्या शुला भागातील काशगर उपविभागातील कोमुकसेरिक टाऊनशिपमधील रहिवासी होत्या.
त्यांचा जन्म 25 जून 1886 साली झाला होता, अशी सरकारकडे नोंद आहे. 2013 मध्ये अलिमिहान या चीनमधील हयात असलेल्या सर्वात वयोवृद्ध व्यक्ती ठरल्या होत्या. तशी नोंद “चायना असोसिएशन ऑफ गेरोंटोलॉजी ऍन्ड गेरिऍट्रीक्स’च्या अहवालात करण्यात आली आहे.
अलिमिहान या अत्यंत साधे आणि नियमित जीवन जगत राहिल्या, त्या अगदी नियमित वेळेवर आहार घेत असत आणि घराच्या आवारात सूर्यप्रकाशात बसत असत. काहीवेळा आपल्या पतवंडांचीही त्या काळजी घेत असत. अगदी अखेरच्या दिवसापर्यंत त्यांचे हे वेळापत्रक नियमितपणे सुरू असायचे.
कौमुक्सेरिक या गावामध्ये अनेक ज्येष्ठ नागरिक आहेत. त्यापैकी अनेक जण 90 पेक्षा अधिक वयाचे आहेत. आरोग्य सुविधांची चांगली सोय यामुळे या भागातील ज्येष्ठ नागरिकांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आहे, असे मानले जाते आहे. स्थानिक प्रशासनाकडून कंत्राटी पद्धतीने डॉक्टरांकडून तपासणी, मोफत वार्षिक आरोग्य तपासणी, 60 वर्षांवरील व्यक्तींना औषधांसाठी अनुदान दिले जाते.