मनसा – मध्य प्रदेशातील मनसा (नीमच) येथून मानवतेला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. येथे एका वृद्धाला मुस्लिम असल्याच्या संशयावरून बेदम मारहाण करण्यात आली. त्यात वृद्धाचा मृत्यू झाला. त्यामुळे मध्य प्रदेश राज्यात गदारोळ झाला आहे.
या प्रकरणी भाजपच्या एका नेत्यावर खुनाचा आरोप आहे. या घटनेचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, त्यात आरोपी वृद्धाला मारहाण करताना आधार कार्ड दाखवण्यास सांगत आहे. रतलाम जिल्ह्यातील भंवरलाल जैन असे ठार झालेल्या वृद्धाचे नाव आहे.
रतलाम जिल्ह्यात राहणारे एक कुटुंब 15 मे रोजी राजस्थानमधील चित्तोडगड येथील किल्ल्यावर भेरूजीची पूजा करण्यासाठी गेले होते. दरम्यान, भंवरलाल जैन हे दुसऱ्या दिवशी कुटुंबीयांना न सांगता गायब झाले. बराच शोध घेऊनही ते सापडले नाहीत. तेव्हा त्यांच्या कुटुंबीयांनी चित्तौडगड पोलीस ठाण्यात हरवल्याची तक्रार दाखल केली.
दरम्यान गुरुवारी मनसा (नीमच) येथील रामपुरा रोडवरील मारुती शोरूमजवळ एका वृद्धाचा मृतदेह आढळून आला. मृताची ओळख 65 वर्षीय भंवरलाल जैन अशी झाली. पोलिसांनी मृताचा फोटो क्लिक करून सोशल मीडियावर टाकला. माहिती मिळताच मृताचे कुटुंबीय मनसा येथे आले आणि शवविच्छेदनानंतर कुटुंबीय भंवरलाल यांचा मृतदेह त्यांच्या गावी घेऊन गेले, तेथे त्यांच्यावर विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले.
दरम्यान मृत वृद्धाचा भाऊ राकेश जैन यांच्या मोबाईलमध्ये एक व्हायरल व्हिडिओ आल्याने या प्रकरणात नवा ट्विस्ट आला. व्हायरल व्हिडिओमध्ये एक व्यक्ती त्यांचा भाऊ भंवरलाल जैन यांना मारहाण करताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये तो माणूस त्या वृद्धाला विचारताना स्पष्ट ऐकू येतो, तुझे नाव मोहम्मद आहे का? जावरा (रतलाम) येथून आला आहे का? चल तुझं आधार कार्ड दाखव…” त्यावेळी मारहाण होत असताना पीडित वृद्ध दयनीय अवस्थेत 200 रुपये घे…” असं म्हणताना दिसतोय.
हा व्हिडिओ मृतकाचा लहान भाऊ राकेश जैन याला पाहताच त्यांनी गावातील लोकांसह मोठ्या संख्येने मनसा पोलीस ठाणे गाठून आरोपीला अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. मनसा पोलिसांनी व्हिडिओ तपासला आणि त्याच्यावर हल्ला करणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवली.
दिनेश कुशवाह असे आरोपीचे नाव असून त्याची पत्नी भाजपच्या तिकिटावर नगरसेविका आहे. तो मनसा येथील काची परिसरातील रहिवासी आहे.