वृद्ध दाम्पत्याची विष पिऊन आत्महत्या; शेतात झाडाखाली आढळले मृतदेह

सोलापूर – वृद्ध शेतकरी दाम्पत्याने विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. शेतातील झाडाखाली त्यांचे मृतदेह आढळले आहेत. पोपट बाबूराव मुळे (वय- 65 वर्षे), आणि कमल पोपट मुळे (वय- 56 वर्षे , दोघे रा. खंडाळी ता. मोहोळ) अशी त्यांची नावे आहेत. आत्महत्येचे कारण अज्ञात असून याप्रकरणी मोहोळ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पती-पत्नी पोपट मुळे आणि कमल मुळे हे गुरुवारी सायंकाळी घरामधून निघून गेले. त्यानंतर त्यांचा मुलगा अमर मुळे आणि चुलत भाऊ बाळू मुळे यांनी परिसरात तसेच नातेवाइकांकडे शोध सुरू केला मात्र त्यांची माहिती मिळाली नाही. त्यानंतर शुक्रवारी सकाळी शेतातील झाडाखाली त्यांचे मृतदेह आढळून आले. त्यांच्या तोंडाला फेस आलेला तसेच कीटकनाशकाचा उग्र वास येत होता. त्यावरून त्यांनी विषारी कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याचे समोर आले. त्यांनी घरातून निघून जाऊन आत्महत्या का केली याचे कारण अज्ञात आहे.

या प्रकरणी बाळू केरू मुळे यांनी पोलिसात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास मोहोळ पोलिस करत आहेत. या दुर्दैवी घटनेमुळे खंडाळी सह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.