पुणे – ज्येष्ठ दाम्पत्यास शस्त्राचा धाक दाखवून घरातील साडे अकरालाखांचा ऐवज लुटण्यात आला. यामध्ये ज्येष्ठ महिला जखमी झाली. हा प्रकार गुरुवारी पहाटे घडला. गुन्ह्याचा छडा लावत कोथरुड पोलिसांनी 24 तासांत आरोपींना जेरबंद केले. केअर टेकर पुरवणाऱ्या एजन्सीचा मालक आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे कृत्य केले होते.
आकाश कांबळे (22, रा. निगडी), दीपक सुगावे (21, रा. चिंचवड), संदीप हांडे (25, रा. वाल्हेकरवाडी) व छगन जाधव (48, रा. चिंचवडगाव) अशी अटक आरोपींची नावे आहेत. छगन हा गुन्ह्याचा मास्टरमाइंड होता. त्याची “अजिंक्य नर्सिंग’ नावाने कामगार पुरवण्याची एजन्सी आहे. याप्रकरणी 74 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली आहे.ते आणि त्यांची पत्नी जय भवानीनगर येथील बंगल्यात राहतात. मुलगा अमेरिकेत, तर विवाहित डॉक्टर मुलगी बावधन येथे राहते.
देखभालीसाठी त्यांनी संदीप याला केअर टेकर म्हणून कामास ठेवले होते. मात्र, दीड वर्षांपूर्वी त्याने काम सोडले. त्यामुळे त्याला घराची पूर्ण माहिती होती. दरम्यान, मध्यरात्रीच्या सुमारास संदीप व त्याचे दोन साथीदार गच्चीवरील खिडकीचे गज कापून आत शिरले. त्यांच्याजवळ घातक शस्त्रे होती. आत आल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला शस्त्र लावत आवाज न करण्याची धमकी दिली. त्यानंतर रोकड आणि दागिने असा 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लुटला. प्राथमिक तपासात आकाश कांबळे हाती लागला. त्यातून इतर साथीदारांची माहिती मिळाली. आकाशच्या हातावरील टॅटू सीसीटीव्हीत दिसल्यानंतर फिर्यादीने “असा टॅटू केअर टेकरच्या हातावर होता’ अशी माहिती दिली. आरोपींनी गुन्ह्यापूर्वी या घराची रेकी केली होती.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, सहायक पोलीस निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, दत्ता शिंदे, हवालदार विलास ढोले, विलास जोरी, अंमलदार नलीन येरुणकर, सचिन कुदळे, विजय कांबळे, मनोज पवार, नितीन कानवडे, युवराज काळे, राहुल ढोबळे, प्रीतम निकाळजे, अजय सावंत, भास्कर बुचडे, विजय काकडे यांच्या पथकाने केली.