एकवीरा देवी नवरात्र उत्सवाला प्रारंभ

मंदिरात घटस्थापना : कोळी बांधवांची दर्शनासाठी गर्दी

कार्ला – महाराष्ट्रातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला-वेहरगाव गडावरील कुलस्वामिनी एकवीरा देवीच्या मंदिरात घटस्थापनेने रविवारपासून नवरात्र उत्सावाला प्रारंभ झाला.

महाराष्ट्रातील तमाम आगरी कोळी, कुणबी समाजाची तसेच ठाकरे घराण्याची कुलदैवत असणाऱ्या कार्ला एकवीरा देवीचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. रविवारी सकाळी सात वाजता एकवीरा देवस्थान प्रशासकीय मंडळाचे सचिव, तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या हस्ते घटस्थापना करण्यात आली. या वेळी एकवीरा देवस्थानचे विश्‍वस्त संजय गोविलकर, काळूराम देशमुख, कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे, वेहरगाव पोलीस पाटील अनिल पडवळ, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मिलिंद बोत्रे, माजी सरपंच गणपत पडवळ, ऍड. जयवंत देशमुख, मंगेश गायकवाड, भरत हुलावळे, संजय देशमुख, विनायक हुलावळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
या नवरात्र उत्सवाच्या काळात भाविकांना सहजतेने आणि सुलभपणे देवीचे दर्शन घेण्यासाठी विशेष उपाय योजना करण्यात आली आहे.

एक रांगेत भाविकांना देवीचे दर्शन देण्यात येणार आहे. गडावर भाविकांना पिण्याचे पाणी, वैद्यकिय सुविधा मिळाव्यात तसेच विना अडथळा गडावर जाता यावे याकरिता संबंधित विभागाने नियोजन करण्याच्या सूचना तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी सर्व विभाग अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

एकवीरा देवस्थानमध्ये वाद सुरू असल्याने वेहरगाव-कार्ला एकवीरा देवी नवरात्र उत्सवाचे नियोजन न्यायालय नियुक्‍त प्रशासकीय मंडळ करीत आहे. परंतु विधानसभा निवडणूक होत असल्याने तहसीलदार व प्रशासकिय अधिकारी निवडणूक नियोजनात व्यस्त आहे. आता निवडणुकीच्या कामातून वेळ काढत त्यांना उत्सवासाठी वेळ मिळेल का असा प्रश्‍न नागरिक उपस्थित आहे. निवडणूक वातावरण असल्याने मुंबईतील इच्छुक उमेदवार आपल्या मतदारांना देवी दर्शनासाठी घेऊन येऊ शकतात. त्यामुळे मंदिरामध्ये गर्दी होऊ शकते याकरिता पोलीस प्रशासनाने खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.