पुणे – महाराष्ट्रातील राजकीय गदारोळात शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या फ्लोअर टेस्टसाठी संपूर्ण आराखडा तयार केला आहे. तसेच मुंबईत येण्यासाठी सज्ज असल्याचं म्हटलं आहे. दुसरीकडे शिवसैनिक आक्रमक असून बंडखोरांना मुंबईत पाय ठेवू देणार नाही, अशी भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे. या वादात आता अखिल भारतीय छावा संघटनेने उडी घेतली आहे.
अखिल भारतीय छावा संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावळे पाटील यांनी पुण्यात पत्रकारपरिषदेत घेऊन आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलयाचं म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांविरोधात जी भाषा वापरली जातेय, त्याचा आम्ही निषेध व्यक्त करतो. तसेच जर शिवसैनिकांच्या हातात बांबू असतील, तर आमच्या हातामध्ये तलवारी असतील एवढच त्यांनी लक्ष ठेवावे. हजारोंच्या संख्येने छावे विमानतळावर एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या रक्षणासाठी सज्ज असेल, असं जावळे पाटील यांनी नमूद केलं.
दरम्यान एकनाथ शिंदे यांनी बंड केले नसून सर्वसामान्यांसाठी राजकीय क्रांती केल्याचं त्यांनी नमूद केलं. तसेच संजय राऊत सारख्या लोकांकडून महाराष्ट्राची संस्कृती बिघडवण्याचा प्रयत्न होत आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यावर आवर घालावी, अन्यथा राऊतांसारख्या लोकांना मराठा समाज ठोकून काढेल, असंही जावळे पाटील यांनी म्हटलं आहे.