टोलनाक्‍यांवरील लेनची संख्या वाढवणार- एकनाथ शिंदे

एकनाथ शिंदे : वाढत्या वाहनांच्या रांगामधून प्रवाशांची होणार सुटका
उड्डाण पुलांचेही होणार सौंदर्यीकरण
मुंबई : मुंबई-पुणे एक्‍सप्रेससह मुंबई व ठाणे शहराच्या प्रवेशद्वावर असलेल्या टोलनाक्‍यावरील वाढत्या वाहनांच्या रांगामुळे मेटाकूटीला आलेल्या प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. या टोलनाक्‍यांवरील रांगांमधून वाहनांची लवकर सुटका व्हावी यासाठी लेन वाढवण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांनी आज दिले.

तसेच राज्यातील सर्व उड्डाण पुलांचा आढावा घेऊन त्यांच्या सुशोभीकरणात एकसुत्रता असावी, अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली. सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली गुुरूवारी एमएसआरडीसीच्या संचालक मंडळाची बैठक झाली. त्यावेळी शिंदे बोलत होते. यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्‍याम मोपलवार, सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सह व्यवस्थापकीय संचालक डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के आदी यावेळी उपस्थित होते.

रस्त्यांच्या कामांमुळे राज्याच्या विकासात भर पडत असून नागरिकांची मोठी सोय होत आहे. मात्र टोल नाक्‍यांवर वाहनांच्या मोठ्या प्रमाणावर रांगा दिसून येतात. विशेषता सुटीच्या दिवशी मुंबई- पुणे द्रुतगती महामार्ग, दहीसर, वाशी या टोलनाक्‍यांवर मोठी गर्दी होत. त्यामुळे नागरिकांना टोल देण्यासाठी तासभर अडकून पडावे लागत आहे. त्यावर उपाय म्हणून टोल नाक्‍यांवरील ही गर्दी कमी करण्यासाठी तातडीच्या उपाययोजना करा. लेनची संख्या वाढवा. हॅण्डहेल्ड मशीनधारकांची संख्या वाढवा, असे निर्देश त्यांनी दिले.

कल्याण-शीळफाटा रस्त्याचे काम तातडीने पूर्ण करा. रस्त्यांवर माती, डेब्रीज काढून टाका व रस्ते स्वच्छ आणि सुंदर करा. रस्त्यांच्या दुभाजकांवर असेल्या कुंड्यांना रंगरंगोटी करा, असे निर्देशही त्यांनी केले. पावसाळ्यामध्ये पुलांवर खड्डे पडतात त्यामुळे अपघात होऊ शकतात. अशा पुलांची तातडीने दुरुस्ती करावी, अशा सूचनाही शिंदे यांनी यावेळी दिल्या.

 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.