Eknath Shinde : विधानसभा निवडणूक निकालाच्या १३ दिवसांनंतर आज अखेर नव्या सरकारचा शपथविधी पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. शिवसेना एकसंघ असताना शिंदे यांच्याकडे नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून जबाबदारी होती. मात्र, त्यानंतर शिवसेनेत पडलेल्या फुटीमुळे एकनाथ शिंदेंना थेट मुख्यमंत्रीपदाची लॉटरी लागली. मात्र, त्यांचा मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर राहिला आहे.
एक सामान्य शिवसैनिक ते महाराष्ट्राच्या राजकारणातील महत्त्वाचे स्थान असलेला सामर्थ्यशाली नेता अशी एकनाथ शिंदे यांची राजकीय क्षेत्रात ओळख निर्माण झाली आहे. १९८४ साली वयाच्या २० व्या वर्षी एकनाथ शिंदे ठाण्यातील किसन नगरचे शाखाप्रमुख झाले. तेथूनच शिंदेंच्या राजकीय प्रवासाला सुरुवात झाली.
एकनाथ शिंदे १९९७ व २००२ मध्ये दोन वेळा ते नगरसेवक झाले. त्यानंतर तीन वर्षे स्थायी समिती सदस्य म्हणून त्यांनी काम केले. तसेच ठाणे महापालिकेत चार वर्षे सभागृह नेता होते. २००४, २००९, २०१४, २०१९ आणि २०२४ या पाच वेळच्या विधानसभा निवडणुकीतून निवडून येत शिंदे आमदार झाले. त्यात शिवसेना पक्षाचे विधीमंडळ गटनेते म्हणून त्यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत काम पाहिले.
१२ नोव्हेंबर २०१४ ते ५ डिसेंबर २०१४ या कालावधीत त्यांनी विधानसभा विरोधी पक्ष नेते म्हणून काम केले. तर ०५ डिसेंबर ते नोव्हेंबर २०१९ दरम्यान त्यांनी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री म्हणून काम केले आहे. यानंतर २०१९ मध्ये मंत्रिमंडळात पहिल्यांदा त्यांना मंत्रिपद मिळाले.तसेच जानेवारी २०१९ मध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याचा कार्यभार व ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून त्यांनी काम पहिले.
त्यानंतर ऑक्टोबर २०१९ मध्ये महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली. या निवडणुकीत ते विजयी झाले असता त्यांची शिवसेनेच्या गटनेतेपदी निवड झाली होती. त्यावेळी त्यांनी नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले आहे.
यानंतर २०२२ मध्ये राजकीय भूकंप झाला झाला तेव्हा शिंदे यांनी शिवेसना पक्ष फोडून भाजपासोबत जात ३० जून २०२२ मध्ये मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. साधारण तीन वर्षांआधी ज्याची कल्पनाही कोणी केली नसती असे राजकारण प्रत्यक्षात आल्यावर त्याच्या केंद्रस्थानी एकनाथ शिंदे राहिले.
मुख्यमंत्री होण्याआधी शिंदेंना पक्षात कायम दुय्यम स्थान मिळत असायचे. जून २०२२ मध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरू होते. त्यावेळी राज्यसभेच्या निवडणुकीचे मतदान झाले आणि त्याच रात्री शिवसेनेत एक मोठे बंड झाले आणि राज्याच्या राजकारणाचे पूर्ण चित्रच बदलून गेले.
एकनाथ शिंदे यांच्या पाठिंब्याने तेव्हा १०५ आमदारांसह सर्वात मोठा पक्ष असणाऱ्या भाजपचा मुख्यमंत्री होणार हे जवळपास निश्चितच होते. मात्र अचानक सर्व चित्र पलटले आणि खुद्द फडणवीसांनीच शिंदे हे मुख्यमंत्री होणार असल्याचे घोषित केले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी ३० जून २०२२ रोजी राज्याचे २० वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती.