मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी बीड ते तिरुपती बालाजीला पायी चालत जात असताना अचानक निधन झालेले कट्टर शिवसैनिक सुमंत रुईकर यांचे घराचे स्वप्न अखेर पूर्ण झाले आहे. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन शिवसैनिकाला घर बांधून दिले आहे.
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनाचे औचित्य साधून सुमंत रुईकर यांच्या बीडमधील नवीन घरकुलाचे भूमिपूजन पार पडले. या भूमीपूजन सोहळ्याला व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित राहून एकनाथ शिंदे यांनी रुईकर कुटुंबीयांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचे स्पष्ट केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीच्या मणक्याची शस्त्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांना लवकर बरं वाटावे. तसेच त्यांना दीर्घायुष्य मिळावे यासाठी सुमंत रुईकर यांनी पायी तिरुपती बालाजीला जाण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार त्यांनी पायी चालायला सुरुवात देखील केली. मात्र रस्त्यात अचानक त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. कर्नाटकमधील रायचूर येथे 26 डिसेंबर रोजी उपचारादरम्यान त्यांचे दुःखद निधन झाले होते. त्यांच्या पश्चात त्यांचे संपूर्ण कुटुंब निराधार झाले होते. शिवसेनेकडून आर्थिक मदत पुरवण्यात आली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या कुटुंबीयांना तातडीने मदत पाठवली होती.