Eknath Shinde । Marathi Language : केंद्र सरकारने मराठी भाषेला दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यात यावा, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. केंद्र सरकारच्या या निर्णयाने मराठी भाषा सातासमुद्रापार जगभरात आणखी जास्त वेगाने आणि प्रभावीपणे पोहोचणार आहे.
दरम्यान, मराठी महाराष्ट्र राज्याची अधिकृत तर गोवा राज्याची सहअधिकृत भाषा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात मराठी भाषकांची एकूण लोकसंख्या सुमारे १४ कोटी आहे. मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही जगातील दहावी व भारतातील तिसरी भाषा आहे. मराठीसह अन्य पाच भाषांना अभिजात दर्जा दिला आहे.
अश्यातच, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. तसेच केंद्र सरकारचे देखील आभार मानले आहे. ते म्हणाले, अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता.
माझा मराठाचि बोलु कौतुके।
परि अमृतातें ही पैजा जिंके ॥
समस्त मराठी जनांचे हार्दिक अभिनंदन!!!अखेर माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला! एका लढ्याला यश आले. यासाठी महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे सतत पाठपुरवठा केला होता. आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान…
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) October 3, 2024
आपल्या लाडक्या भाषेचा यथोचित सन्मान केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह तसेच केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांचे आम्ही आभार मानतो. या कामात अनेक मराठी भाषक, विचारवंत, भाषेचे अभ्यासक, साहित्यिक आणि समीक्षकांचे साह्य झाले. त्यांचेही मन:पूर्वक आभार!
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
आजचा दिवस मायमराठीच्या इतिहासातील एक ऐतिहासिक दिवस! मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा निर्णय आज केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्व सन्माननीय मंत्र्यांचे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या वतीने अतिशय मनापासून आभार मानतो.
हा दिवस उजाडावा, यासाठी मी मुख्यमंत्री असताना आणि आताही मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्त्वात सातत्याने पाठपुरावा केला. लीळाचरित्र, ज्ञानेश्वरी, विवेकसिंधू अशा अनेक ग्रंथाचा आधार घेत मराठी भाषा ही अभिजातच आहे, हे सिद्ध करण्यासाठी अनेक थोरा-मोठ्यांचे, अभ्यासकांचे यासाठी हातभार लागले. मी त्यांचाही अत्यंत आभारी आहे.
अखेर आज तो सुदिन अवतरला. नवरात्रीच्या पहिल्या दिवशी मायमराठीचा हा बहुमान मनाला अतिशय सुखद अनुभूती देणारा आहे. महाराष्ट्रातील आणि जगभरातील तमाम मराठीजनांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो. मराठी भाषेच्या सर्वांगिण विकासासाठी आता अनुदानासह केंद्र सरकारच्या पातळीवर सुद्धा सर्व ते सहकार्य मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.