Eknath Shinde : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांची तयारी वेगाने सुरू केली आहे. कालपासून पक्षाने संघटनात्मक बळ वाढवण्यासाठी मोठे पाऊल उचलले असून, लोकसभा संपर्कप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाने संघटनवाढीवर विशेष लक्ष केंद्रित केले असताना, आता पंढरपूरमधून एक मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. पंढरपूरमधील दोन बडे नेते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे माजी चेअरमन भगीरथ भालके आणि पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता भगीरथ भालके एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटात प्रवेश करणार आहेत. कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा घेऊन आणि प्रदर्शन करत भालके दांपत्य शिवसेनेत सामील होणार असल्याची माहिती समोर आली आहे. Eknath Shinde पंढरपूरमध्ये भालकेंची मजबूत पकड भालके कुटुंबीयांकडे पंढरपूर नगरपालिकेत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे ११ नगरसेवक आहेत. भगीरथ भालके यांच्या शिवसेना शिंदे गटात प्रवेशामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील ताकद लक्षणीयरीत्या वाढणार आहे. नुकत्याच झालेल्या पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत प्रणिता भालके यांनी भाजप उमेदवार श्यामल शिरसाट यांच्याविरुद्ध जोरदार प्रचार केला होता. तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून उमेदवारी असलेल्या प्रणिता भालके यांनी मोठ्या मताधिक्याने बाजी मारली आणि १४ वर्षांनंतर पंढरपूर नगरपालिकेत सत्तांतर घडवले होते. भालके कुटुंबाचा राजकीय प्रवास भालके कुटुंबीयांचा राजकीय इतिहास बराच मोठा आहे. दिवंगत भारत भालके हे काँग्रेसचे आमदार होते. त्यांच्या निधनानंतर भगीरथ भालके यांनी एकत्रित राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली, परंतु त्यांना पराभव स्वीकारावा लागला. नंतर भालके कुटुंबाने स्थानिक स्तरावर लक्ष केंद्रित केले. प्रणिता भालके यांनी तीर्थक्षेत्र विकास आघाडी स्थापन करून पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीला सामोरे गेले आणि विजय मिळवला. या विजयानंतर एकनाथ शिंदे यांनी “पंढरपूरमध्ये आपलाच नगराध्यक्ष झाला” असे विधान केले होते आणि त्यावेळीच भालके कुटुंब शिवसेनेकडे वळण्याचे संकेत मिळाले होते. शिंदे गटासाठी मोठा फायदा भालके दांपत्याचा प्रवेश हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी पंढरपूर परिसरात मोठा बूस्ट मानला जात आहे. आगामी निवडणुकांसाठी संघटनात्मक तयारी वेगाने सुरू असताना, या प्रवेशामुळे शिंदे गटाची पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील ताकद अधिक मजबूत होणार आहे.