मुंबई – एकनाथ शिंदे यांनी आमदारांचा वेगळा गट करत भाजपच्या पाठींब्याने मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्यातील अंतर वाढतच चालले होते. अनेकदा शिवसेना नेते आणि शिंदे गटातील आमदारांमध्ये शाब्दिक आरोप प्रत्यारोप झाल्याचे देखील पाहायला मिळाले. यानंतर अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी शिंदे आणि ठाकरे यांची भेट होणार असल्याचे ट्विट केल्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय.
सय्यद यांनी ट्विटरवरून एक फोटो शेअर केलाय ज्यामध्ये शिवसेनेच्या धनुष्यबाणासह त्यांचा फटो देखील आहे. विशेष म्हणजे नावापुढे शिवसेना नेत्या असं लिहून त्यांनी ही पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी या मध्यस्थीसाठी भाजप नेत्याने मदत केली असल्याचे म्हंटले आहे. या ट्विटमुळे मात्र राजकीय वर्तुळामध्ये चर्चाना जोरदार उधाण आले आहे.
काय म्हटलंय दीपाली सय्यद यांनी नेमकं ट्विटमध्ये
येत्या दोन दिवसात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करुन पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरं वाटलं. शिंदे साहेबांनी शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखांची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहेत. या मध्यस्तीकरता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद, चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल, असं ट्वीट शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांनी केलं आहे.
@OfficeofUT
@mieknathshinde
@TawdeVinod
@Pankajamunde pic.twitter.com/20JnC3QSma— Deepali Sayed (@deepalisayed) July 16, 2022
या आधी देखील दीपाली सय्यद यांनी अनेकदा ठाकरे कुटुंबीय आणि शिवसेनेसाठी ट्विट केल्याचे दिसून आले आहे. यावेळेसच्या ट्विटमध्ये उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि विनोद तावडे यांना देखील टॅग केल्यामुळे राजकीय चर्चांना चांगलेच उधाण आले आहे.