Eknath Khadse | Maharashtra Assembly Election 2024 : राज्यात आज विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत. त्याच दृष्टीने प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवाराचा जोरात प्रचार करत असून विरोधकांवर देखील सडकून टीका करत आहे. दरम्यान, अश्यातच जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाराष्ट्रातील जनतेला भावनिक साद घातली आहे.
एकनाथ खडसे यांनी त्यांच्या फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट करत ‘पुढची निवडणूक मी पाहील की नाही हे ईश्वरच ठरवेल, पुढच्या निवडणुकीत मी असेल किंवा नसेल’, असं म्हणाले आहेत.
नेमकं काय म्हणाले एकनाथ खडसे, पाहा…
ते म्हणाले की, ‘यापुढे मी निवडणूक न लढाविण्याचा निर्णय घेतला आहे. मी गेली अनेक वर्ष आपल्या सोबत आहे. अनेक वर्ष आपणही मला सहकार्य केले आहे, मला आशीर्वाद दिले आहेत.
मी ही तुमच्या सुख दुःखात सहभागी झालेलो आहे. कोणतीही जात धर्म न पाळता मी सर्वांना मदत करण्याची भूमिका आता पर्यंत पार पाडली आहे.
तब्येत ठीक नसते, पुढील निवडणूक मी पाहणार की नाही पाहणार हे तो ईश्वरच ठरवेल. पुढील निवडणुकीत कदाचित मी असेल किंवा नसेल. पण या निवडणुकीत मी आपल्याला विनंती करणार आहे.
की आपण सर्वांनी रोहिणीताईंना निवडून द्यावे. आपण जसं मला सहकार्य केलं तसं रोहिणीताईंना करावं आणि रोहिणी ताईंना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे ही विनंती.’ या आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकीसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान आणि 23 नोव्हेंबर रोजी या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. आज (18 नोव्हेंबर) निवडणुकीच्या प्रचाराचा शेवटचा दिवस आहे.