राष्ट्रवादीकडून विरोधी पक्षनेतेपदाची ऑफर

एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट 

जळगाव – भाजपकडून उमेदवारी नाकारल्यानंतर भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राज्याच्या राजकारणात मोठा गौप्यस्फोट केला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून विरोधी पक्षनेते पदाची ऑफर होती, असा गौप्यस्फोट खडसे यांनी केला आहे. शिवाय, राष्ट्रवादीचे नेते एबी फॉर्म घेऊन उमेदवारीसाठी घरी आल्याचा खुलासाही खडसेंनी केला.

भुसावळ येथे भाजप उमेदवार संजय सावकारे यांच्या प्रचारसभेत ते बोलत होते. एकनाथ खडसे म्हणाले, आपल्यावर अन्याय झाला हे खरं आहे. त्यासाठी माझा गुन्हा काय हे मी पक्षाला विचारणा करणार आहे. पण ज्या पक्षाने मला मंत्रीपद दिले, विरोधी पक्षनेता बनवले, संपूर्ण महाराष्ट्राला माझी ओळख दिली, त्या पक्षाला मी सोडून जाणं हे माझ्या मनाला न पटणार आहे, असे एकनाथ खडसे म्हणाले.

मुक्ताईनगर येथे भाजपने एकनाथ खडसे यांचे तिकीट कापून त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांना उमेदवारी दिल्यानंतर राष्ट्रवादीने आपल्या उमेदवाराला उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला लावत, सेनेचे बंडखोर उमेदवार चंद्रकांत पाटील यांना आपला पाठिंबा दर्शविला आहे. एखाद्या राष्ट्रीय पक्षाला आपला उमेदवार माघारी घ्यावा लागून एका अपक्षाला पाठिंबा द्यावा लागतो. यावरुन मुक्ताई नगरमध्ये राष्ट्रवादी पक्षाची किती दयनीय अवस्था झाली आहे, हे लक्षात येत असल्याचे खडसे यांनी म्हटले आहे.

तसेच माझ्या मुलीच्या उमेदवारी विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष बंडखोर उमेदवारास शरद पवार यांच्यासारख्या नेत्याने पाठिंबा द्यावा, अशा नेत्याला राष्ट्रीय नेता म्हणावे का?, असा सवाल करीत खडसे यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.

Leave A Reply

Your email address will not be published.