‘एक’नाथ हैं तो सेफ है’; मुख्यमंत्री पदाच्या सस्पेनदरम्यान शिंदेंचे पोस्टर चर्चेत; भाजप नेते काय म्हणाले?

Eknath hai to safe hai | राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठे यश मिळाले. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण होणार याबद्दलचा सस्पेन्स कायम आहे. काल एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सध्या एकनाथ शिंदे हे काळजीवाहू मुख्यमंत्री आहे. परंतु पुन्हा एकदा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचीच वर्णी लागावी, अशी शिवसैनिकांकडून मागणी केली जात आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय होण्यापूर्वी एकनाथ शिंदे गटाच्या आमदार मनीषा कायंदे यांनी पोस्ट शेअर केली आहे. सध्या या पोस्टरची चांगलीच चर्चा रंगली आहे.
या पोस्टरवर ‘एक’नाथ हैं तो सेफ है’ असे लिहिण्यात आले आहे. भाजपने विधानसभा निवडणुकीत एक हैं तो सेफ है असा नारा दिला होता. त्यात बदल करत शिवसेनेच्या नेत्यांकडून ‘एकनाथ है तो सेफ है’, असे म्हटले गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विधानसभा प्रचारावेळी एक हैं तो सेफ है असा नारा दिला होता. या घोषणेची संपूर्ण निवडणूक प्रचाराच्या काळात चर्चा झाली. यातून भाजपने ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप विरोधकांनी केला. भाजपची ही घोषणा निवडणूक निकालात फायदेशीर ठरली. या पोस्टरद्वारे शिंदे गटाने राजकीय संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
यावर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, “पंतप्रधानांनी एक आहे तर पूर्ण हिंदुस्थान सेफ आहे. एक आहोत, तर आपण सर्व सुरक्षित आहोत. पूर्ण देश आणि समाजासाठी हे म्हटलं आहे. पण आता कुठलं कुठे जोडत आहेत,” असे म्हणत त्यांनी यावर अधिक भाष्य केले नाही.
एक “नाथ”
हैं तो
सेफ हैं…!@mieknathshinde @Shivsenaofc pic.twitter.com/PsJJqEr6GH— Dr.Manisha Kayande (@KayandeDr) November 26, 2024
एकनाथ शिंदे दोन ऑफर दिल्या?
दुसरीकडे, एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा हट्ट सोडण्यासाठी भाजपकडून त्यांना दोन ऑफर देण्यात आल्या आहेत. पहिली ऑफर अशी कि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्याची भाजपची तयारी आहे. तर एकनाथ शिंदे यांना भाजपकडून राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची दुसरीॲाफर दिली आहे. मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे राहणार आहे. यावर अद्याप शिवसेनेकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आली नाही.
बिहार पॅटर्न राबवणार ?
महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे आणि भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांची नावे चर्चेत आहेत. जास्त जागा जिंकल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्याला मुख्यमंत्री करावे, अशी भाजप समर्थकांची इच्छा आहे. बिहारमध्ये कमी जागा असूनही नितीशकुमार जसे मुख्यमंत्री आहेत, तसेच शिंदे यांनाही मुख्यमंत्री करावे, असा शिंदे गटाचा युक्तिवाद आहे.





